वर्धा : मोठ्यांच्या आशीर्वादाचे बळ पाठीशी असले की यशाचे द्वार उघडायला मदत होते, अशी पारंपारिक श्रद्धा. पण तेच पुरेसे नसते. त्यासोबत खडतर मेहनत व चिकाटी ठेवून ध्येयासाठी वाटचाल करणे, गरजेचे ठरते. हेच ऋषिकेश सतीश दाणी या युवकाने दाखवून दिले आहे. आई वडील हाडाचे शेतकरी व सोबतच शेतकरी संघटनेचे आजही निष्ठावंत कार्यकर्ते. त्यांच्या मुलाने आज यशाला कवेत घेतले आणि त्यांना शरद जोशी यांचे बोल आठवले. ‘ एक दिवस तू नक्की मोठा होशील ‘.

खेड्याशी जुळलेली नाळ

देवळी तालुक्यातील सोनेगाव आबाजी हे एक लहानशे खेडे. लगतच्या पुलगाव दारुगोळा भंडार येथील बॉम्ब निकामी करतांना होणाऱ्या स्फ़ोटाच्या सावटात जगणाऱ्या या गावात सतीश दाणी हे कुटुंबासह शेती करतात. ते तरुणपणीच शरद जोशी यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेच्या आंदोलनात उतरले. आताही मूठभर कार्यकर्ते असलेल्या या संघटनेचे उपक्रम दाणी चालवितात. पण कुटुंबातील मुलाने अभ्यासाकडे दुर्लक्ष नं करता वाटचाल सूरू ठेवली.

असे झाले शिक्षण

ऋषिकेश याने गावातच प्राथमिक शिक्षण घेत पुढे विविध ठिकाणी नंतरचे शिक्षण घेतले. VNIT नागपूर येथे B.Tech. या पदवीस असतांना कोरोना आला आणि घरीच अभ्यास करावा लागला. पण पदवी प्राप्त करीत स्पर्धा परीक्षा देणे सुरू केले. ही सर्व वाटचाल एकही शिकवणी नं लावता. SSC अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षापण घरच्याच तयारीवर. गतवर्षी पहिल्याच संधीत कर सहाय्यक म्हणून निवड झाली. आता तो CBDT मध्ये निवडल्या गेला.

आयकर अधीक्षक म्हणून निवड.

केंद्रीय परीक्षेच्या  माध्यमातून ऋषिकेश याने CBDT संस्थेत प्रवेश केला आहे. Central Board of Direct Taxes म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ ही केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी महत्वाची संस्था आहे. करांशी संबंधित धोरणे व नियमावली तयार करणारी ही सर्वोच्च संस्था समजल्या जाते. यात नागपूर विभागीय आयकर कार्यालयात अधीक्षक म्हणून ऋषिकेश यास नियुक्ती मिळाली आहे. पण तो म्हणतो यापुढे जाण्याचा मानस आहे. SSC परीक्षेच्या तीन संधी बाकी आहेत. त्यात यशस्वी व्हायचंय. तयारी सुरू आहे. बघू.

शरद जोशी यांचा आशीर्वाद

शेतकरी संघटनेशी जुळलेले हे कुटुंब आहे. संघटना नेते शरद जोशी हे त्यांचे पंचप्राण. दिवं. शरद जोशी यांचे या घरावर लक्ष असायचे. ते राज्यसभेचे खासदार असतांना त्यांनी कुरुक्षेत्र येथे गव्हाच्या भावासाठी आंदोलन पुकारले होते. त्यावेळी चवथ्या वर्गात असणारा ऋषिकेश हा आईवडीलसोबत या आंदोलनात उतरला होता. आंदोलन झाल्यावर हे कुटुंब जोशी यांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी मुक्कामी होते. परतीच्या वर्धा प्रवासास निघतांना जोशी यांनी ऋषीसोबत संवाद साधला. आणि ‘ तू मोठा होशील ‘ असा आशीर्वाद दिला. आज ऋषीच्या प्रयत्नास जोशी यांच्या आशीर्वादाचे बळ मिळाले आणि अधिकारपद चालून आले. सध्या तो घरी पेरणीची गडबड सूरू असल्याने पूरक मदत वडिलांना करीत आहे.