अकोला : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामध्ये वाशीमचा समावेश अंशत: असून त्याचा फारसा उपयोग होणार नाही. सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी गोदावरी लवादानुसार ६७९ दलघमी पाण्यामधून आकांक्षित वाशीम जिल्ह्यासाठी किमान २०० दलघमी पाण्याची उपलब्धता आवश्यक आहे. या संदर्भात जलसंपदा मंत्री असतांना दिलेल्या आदेशाला प्रशासकीय गती देण्याची मागणी जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू म्हणून सचित कुळकर्णी यांची ओळख असून त्यांनी नदीजोड प्रकल्पाच्या लाभावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.  

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामध्ये वाशीम जिल्ह्याच्या समावेशाचा मोठा कांगावा नगर पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केला जात असला तरी त्या तुलनेत जिल्ह्याला अल्पसा लाभ होणार असल्याचा दावा त्यांनी पत्रात केला आहे. या प्रकल्पातून २० हजार ८१८ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असल्याचे सांगितल्या जात होते. या प्रकल्पातून एवढे सिंचन होऊ शकणार नाही. राज्य शासनाची एकंदरीत आर्थिक परिस्थिती लक्षात घेता या प्रकल्पासाठी किती कालावधी लागेल, याची कुठलीही शाश्वती नाही. सिंचनाची राज्य सरासरी साधण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील एक लाख २४ हजार ९८० हेक्टर रब्बी समतुल्य सिंचनाची आवश्यकता आहे. हा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी गोदावरी लवादानुसार हक्काचे ऊर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगा टप्प्यातील केवळ २०० दलघमी पाणीसाठा उपलब्ध करून दिल्यास राज्य सरासरीपेक्षा अधिक सिंचनाचा अनुशेष साधल्या जाईल, असे सचिन कुळकर्णी यांनी नमूद केले.

नदीजोड प्रकल्पामुळे कारंजा आणि मालेगाव तालुक्यातील जिल्ह्याच्या सीमारेषेवर अल्पसा लाभ मिळेल. मात्र, २०० दलघमी पाणी उपलब्धतेमुळे वाशीम जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील शेतीला सिंचनाचा तसेच नागरी वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. याचप्रमाणे पैनगंगा नदीवरील रिसोड तालुक्यातील येवती, भापूर, धोडप, बाळखेड, म्हसला, आसेगाव या सहा बंधाऱ्याचे रुपांतरण बॅरेजमध्ये करता येईल. त्यामुळे १५५३ हेक्टर शेती सिंचनाखाली येईल, असेही ते म्हणाले.

कार्यवाहीच्या आदेशाला खीळ

यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दि. ११ नोव्हेंबर २०२३ आणि ९ सप्टेंबर २०२४ ला पत्र देऊन अवगत केले. त्यानुसार तत्कालीन जलसंपदा मंत्री असताना १४ डिसेंबर २०२३ च्या पत्रानुसार कार्यवाहीच्या करण्याचे आदेश दिले होते. सर्व स्तरावरून सकारात्मक अहवाल येऊन सुद्धा मंत्रालयात अद्यापपर्यंत खीळ बसल्याचे कुळकर्णी यांनी सांगितले.