नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील नात्यांचे बंध दिवसेंदिवस घट्ट होत आहेत. तो ज्या वाघिणीच्या सर्वाधिक प्रेमात पडला, ती “जुनाबाई” वाघीण आता सातव्यांदा आई झाली आहे आणि यावेळी तिने चार बछड्यांना जन्म दिला आहे. जंगलातील तिच्या या बछड्यांचा हा कौतुक सोहळा वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार निखिल अभ्यंकर यांनी अलगद कॅमेऱ्यात टिपला आहे.
“जुनाबाई” या नावामागची कथा
चिमूर तालुक्यातील मदनापूर गावापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर जंगलात “जुनाबाई” नावाचे एक मंदिर आहे. पूर्वापार असलेले हे मंदिर स्थानिक गावकऱ्यांच्या श्रद्धास्थानी आहे. आख्यायिका अशी आहे, की जुनाबाई, चिंदाबाई आणि सोनाबाई या बहिणी जंगलात हरवल्या होत्या. त्या सापडल्या नाहीत. त्यांच्याच नावाला धरून मग भर जंगलातच मूर्ती उभारल्या गेल्या. पुढे जुनाबाईचे मंदिर बांधले गेले. याच परिसरात जन्म झालेल्या वाघिणीला ‘जुनाबाई’ हे नाव मिळाले.
“जुनाबाई” ताडोबाची “सुपरमॉम”
मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पातील “कॉलरवाली” वाघीण “सुपरमॉम” या नावाने ओळखली जात होती. १७ वर्षांचे आयुष्य जगलेल्या या वाघिणीने आठ वेळा मातृत्वाचा अनुभव घेतला आणि २८ बछड्यांना जन्म दिला. १३ वर्षाची “जुनाबाई” वाघीण तिच्याच पावलावर पाऊल टाकत आहे. तिनेही सातवेळा मातृत्वाचा अनुभव घेतला आणि २३ बछड्यांना जन्म दिला.
बछड्यांसाठी”जुनाबाई” चा संघर्ष
“कणकाझरी” वाघापासून “जुनाबाई”ला सुरुवातीला तीन, नंतर चार आणि तिसऱ्या वेळी तीन बछडे झाले. “मटकासुर” वाघाने तिचे तीनही बछडे मारले. यानंतर तिला ‘मटकासुर’पासून चार बछडे झाले, मात्र या बछड्यांना नव्याने आलेल्या ‘ताला’ नावाच्या वाघाने मारले. या सर्व प्रकारामुळे ‘जुनाबाई’ बछड्यांचा जन्म झाल्यानंतर आपल्या पिल्लांना घेऊन दाट आणि अत्यंत सुरक्षित भागात राहू लागल्याने बराच काळ ती दिसत नसे.
पर्यटकांवर “जुनाबाई” ची छाप
“जुनाबाई”च्या संघर्षामुळे ती आज पर्यटकांमध्ये एक आकर्षण बनली आहे. तिच्या बछड्यांना वाचवण्यासाठी तिची एक छाप पर्यटकांवर पडली आहे. “जुनाबाई” वाघिणीच्या जीवनातील हा संघर्ष फक्त तिचा नाही, तर जंगलातील सर्व वाघिणींचा आहे. नर वाघांपासून आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या या वाघिणीपुढे नतमस्तक व्हायलाच हवी.
“जुनाबाई”चे सुरक्षा कवच
सततच्या भीतीपोटी अथवा अधिक दक्ष होऊन वाघिणींना आपल्या वावरण्यावर अनेक मर्यादा येऊ शकतात, हे या वाघिणीकडे बघितल्यानंतर लक्षात येते. मात्र, बछड्यांसाठी ती कायम एक सुरक्षा कवच घेऊन वावरते. म्हणूनच तिचे बछडे एक मोकळा श्वास घेऊन जंगलात वावरत असतात. निखिल अभ्यंकर यांच्या व्हिडिओत ते स्पष्टपणे दिसून येते.
