नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प जागतिक पातळीवरील पर्यटकांसाठी आवडता व्याघ्रप्रकल्प ठरला आहे. भल्याभल्यांना आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या “व्याघ्रप्रकल्पात क्रिकेटचा देव”, “मास्टरब्लास्टर” अशा एक ना अनेक विशेषण नावांसमोर असलेला सचिन तेंडुलकरला देखील या व्याघ्रप्रकल्पाने वेड लावले आहे.. त्यामुळे जवळपास दरवर्षी तो ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात व्याघ्रदर्शनासाठी येतो.
एवढेच नाही तर नागपूर विमानतळावर उतरल्यावर ताडोबाला जाण्यासाठी स्वतः कारचे स्टेअरिंग हातात घेतो. शुक्रवारी देखील तेंडुलकर ने तेच केले. नागपूर विमानतळावर उतरताक्षणी त्याने ताडोबाला जाण्यासाठी कारचे स्टेअरिंग हाती घेतले. यावेळी त्याच्यासोबत पत्नी अंजली तेंडुलकर देखील होती.
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजली तेंडुलकरसह आणि दोन जिवलग मित्रांसह शुक्रवारी ताडोबात दाखल झाला. दोन दिवसांचा त्यांचा हा दौरा पूर्णपणे खासगी स्वरूपाचा आहे. मुंबईहून नागपूरमार्गे तेंडुलकर चिमूरजवळील बांबू रिसॉर्टमध्ये पोहोचला.
पहिल्या सफरीने निराश केले..
दुपारी तीन वाजता त्यांनी कोलारा कोअर झोनमध्ये पहिली सफारी केली. त्यांच्या सोबत मित्र जगदीश, नागपूरमधील आणखी एक मित्र आणि त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. सायंकाळी साडेसहा वाजता तेंडुलकर व मित्र परत आले, मात्र पहिल्या सफारीत त्यांना एकाही वाघाचे दर्शन झाले नाही. त्यामुळे आजच्या सफारीबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे.
शनिवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सफारी ते करणार आहेत. तर रविवारी सकाळची आणखी एक सफारी करून दुपारी नागपूरमार्गे मुंबईकडे परत जाणार आहेत.
ताडोबाशी सचिनचा संबंध कायम..
सचिन तेंडुलकर दरवर्षी ताडोबाला भेट देत असून येथील वाघांविषयी त्यांना विशेष आकर्षण आहे. कोअर झोनमधील प्रसिद्ध छोटीतारा, बिजली, रोमा, मोगली, युवराज आणि बलराम यांच्याशिवाय जुनाबाई वाघिणीच्या तिन्ही पिढ्या त्याने पाहिल्या आहेत. सध्या बिजली वाघिणीला तीन, तर रोमा वाघिणीला चार बछडे असून रोमा पर्यटकांना वारंवार दिसत असल्याने या परिसरात पर्यटनाला विशेष भर पडली आहे.
सचिनचा दौरा कायमच चर्चेत..
ताडोबातील सचिनचा वार्षिक दौरा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. गेल्या वर्षी त्यांनी ताडोबातील एका शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता आणि भेटवस्तूही दिल्या होत्या. या दौऱ्यात ते परिसरातील काही गावांना भेट देणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
