नागपूर : क्रिकेटचा देव, मास्टरब्लास्टर अशा एक ना अनेक बिरुदावली नावासमोर असणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या प्रेमात जगभरातील लाखो, करोडो चाहते आहेत. मात्र, सचिन तेंडुलकर लाखो, करोडो चाहत्यांच्या नव्हे तर ‘जुनाबाई’वर असलेल्या त्याच्या प्रेमासाठी वर्षातून किमान दोनदा तरी भेटीला येतो. सुमारे दोन वर्षांपूर्वी जायची वेळ आली तरी ‘जुनाबाई’शी त्याची भेट झाली नव्हती. मात्र, बुधवारपासून ताडोबात मुक्कामी असलेला सचिन तेंडुलकरला अखेरीस ‘जुनाबाई’ भेटली आणि सचिनच्या प्रतीक्षेचं सार्थक झालं.

ताडोबाशी सचिन तेंडुलकरचे घट्ट नाते

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यांचे नाते घट्ट आहे. एवढेच नाही तर या जंगलाशी त्याचे नाते घट्ट करण्यात या व्याघ्रप्रकल्पातील वाघांची भूमिका मोठी आहे. त्यामुळेच वारंवार त्याची पावले ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाकडे वळतात. वाघांच्या एक नाही तर तीन पिढ्यांचा तो साक्षीदार राहिला आहे.

‘जुनाबाई’ ही वाघीण त्यातलीच एक आहे. ताडोबाची ‘सूपरमॉम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जुनाबाई’ या वाघीणीने आतापर्यंत २०पेक्षा अधिक बछड्यांना जन्म दिला आहे. आताही ती सातव्यांदा आई झाली असून चार बछड्यांसह सर्वांनाच दिसून येत आहे. त्यामुळे इतरही पर्यटक सुखावले आहेत.

मदनापूर हा जुनाबाईचा हक्काचा अधिवास

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मदनापूर बफर क्षेत्र म्हणजे ‘जुनाबाई’ या वाघिणीचा हक्काचा अधिवास. ती मदनापूरची राणी आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.‘जुनाबाई’ नावाच्या मंदिर परिसरात या वाघिणीचे वास्तव्य असल्याने वन्यजीवप्रेमींनी तिला ‘जुनाबाई’ नाव दिले व ती याच नावाने प्रसिद्ध आहे.

तब्बल सातवेळा तिने मातृत्त्वाचा अनुभव घेतला असून २० पेक्षा अधिक बछड्यांची ती आई आहे. तिचे आधीचे बछडे मोठे झाले असून त्यांनीदेखील अनेक बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे तिच्या तीन पिढ्या ताडोबात एकत्र वास्तव्यास आहेत. याच ‘जुनाबाई’ वाघिणीने सचिन तेंडुलकरला देखील भुरळ घातली आहे. केवळ ‘जुनाबाई’ वाघीणच नाही तर तिच्या तिन्ही पिढ्या या मास्टरब्लास्टरने जवळून पाहिल्या आहेत.

यावेळचा दौरा अतिशय गुप्त

२०२५च्या अखेरीस सचिन तेंडुलकर त्याच्या कुटूंबियासह ताडोबात आला होता. त्यावेळी नागपूर विमानतळावरुन तो स्वत: कार चालवत ताडोबात पोहोचला. यापूर्वीदेखील त्याने नागपूर विमानतळावरुन ताडोबात जाण्यासाठी स्वत: कारचे स्टेअरिंग हाती घेतले. आता बुधवारीच तो ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात दाखल झाला. त्याने ताडोबा-कोअरची सफारी केली.

तसेच मदनापूर बफरची देखील सफारी केली. यावेळी त्याला ‘जुनाबाई’ तिच्या चार बछड्यांसह भेटली. यावेळी मात्र सचिन तेंडूलकरचा हा दौरा फारच गुप्त ठेवण्यात आला आहे. त्याचे एकही छायाचित्र, व्हिडिओ बाहेर आलेले नाहीत. तर त्याच्या या दौऱ्याबाबत कुणी काहीही सांगायला तयार नाही. मात्र, त्याचे कुटुंबिय यावेळी सोबत असल्याचे कळाले.