नागपूर : “क्रिकेटचा देव’ अशी लोकांनीच ज्याला पदवी दिली, तो मास्टरब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर गेले तीन दिवस ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मुक्कामी होता. नेहमीच्या सफारी क्षेत्रासोबतच त्याने नव्यानेच सुरू झालेल्या सफारी गेट ला भेट दिली.
नव्या सफारी मार्गाची राज्यभर चर्चा
‘मास्टर ब्लास्टर’ भारतरत्न सचिन तेंडुलकर त्याच्या कुटुंबासह बुधवारी ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात आला. या व्याघ्रप्रकल्पात नव्यानेच कच्चेपार सफारी गेट (सिंदेवाही) सुरू करण्यात आले आहे. या सफारी गेटला शनिवारी भेट देत त्याने सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. या प्रवेशद्वाराचे पहिले खास पाहुणे होण्याचा मान तेंडुलकर ने पटकावला. क्रिकेट विश्वातील ‘देव’ मानल्या जाणाऱ्या सचिन यांच्या या भेटीमुळे नव्या सफारी मार्गाची राज्यभर चर्चा रंगू लागली आहे.
वाघाने हुलकावणी दिली
सिंदेवाहीच्या हिरव्यागार जंगलरांगांमध्ये सफारी करताना सचिन यांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. सफारीदरम्यान त्यांना वाघाचे दर्शन झाले नसले, तरीही त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त न करता जंगलातील शांतता, जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्याचे मनापासून कौतुक केले. “व्याघ्र दर्शन हुकलं तरी निसर्गाची सोबत आणि जंगलातील शांतता मनाला सुखावणारी ठरली,” अशी भावना त्यांनी व्यक्त केल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिली तेंडुलकर ला माहिती
या भेटीदरम्यान त्यांनी जंगलातील विविध वृक्षप्रजाती, पक्षी आणि परिसरातील जैवविविधतेची बारकाईने पाहणी केली. सिंदेवाही क्षेत्रातील वनाधिकारी अंजली सायंकाल यांनी सचिन यांना कच्चेपार मार्गाची रचना, या क्षेत्रातील वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व आणि भविष्यातील पर्यटनवाढीची क्षमता याबाबत सविस्तर माहिती दिली. सचिन यांनीही वन विभागाच्या कार्याचे कौतुक करत अधिकाऱ्यांशी काही काळ संवाद साधला आणि छायाचित्रेही काढली.
सचिनच्या भेटीने पर्यटनाला नवी चालना
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कच्चेपार (सिंदेवाही) गेट नव्याने सुरू झाल्यामुळे या भागातील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः सिंदेवाही परिसरातील तुलनेने कमी गर्दीचा जंगलपट्टा पर्यटकांसाठी नवीन आकर्षण ठरणार आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वनाधिकाऱ्यांना आशा
क्रिकेट क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्त्व असलेल्या सचिन तेंडुलकर यांनी या गेटला पहिली भेट दिल्यामुळे या सफारी मार्गाची प्रसिद्धी झपाट्याने वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आगामी काळात देश-विदेशातील पर्यटकांचा ओघ या नव्या प्रवेशद्वाराकडे वळण्याची शक्यता वन विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
