अकोला : सफाई कामगारांसाठी शासनाने अनेक योजना जाहीर केल्या असल्या, तरी त्यांची अंमलबजावणी केवळ कागदावरच मर्यादित राहिली आहे, अशी नाराजी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी वाशीम येथे व्यक्त केली.
वर्षांपासून वास्तव्य, तरीही सफाई कामगारांना मालकी हक्काचे पट्टे नाहीच
हाताने मैला उचलण्यास प्रतिबंध अधिनियम २०१३ च्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्राधिकरणांचा आढावा त्यांनी घेतला. अनेक ठिकाणी २५ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या सफाई कामगारांना अद्याप मालकी हक्काचे पट्टे मिळालेले नाहीत. तसेच २००८ पासून प्रलंबित घरकुल योजनांची अंमलबजावणीही पूर्ण झालेली नाही. स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटूनही या घटकाला मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करावा लागत असल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली. नगर परिषदांमध्ये कामाचा वेग अत्यंत मंद असल्याचे त्यांनी नमूद करत जमीन नाही, निधी नाही अशी कारणे दिली जातात. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून वेळोवेळी आढावा घ्यावा असे निर्देशही त्यांनी दिले.
आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?
सीमेवर सैनिक देशाचे रक्षण करतो, तर शहरात सफाई कामगार नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करतो. मात्र, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी सफाई कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेकडे होत असलेल्या दुर्लक्षावर बोट ठेवले. लाभ देण्यात अनियमितता व गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित प्राधिकरणावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. कामगारांच्या बाबतीत सुट्ट्या, किमान वेतन व सेवा अटींबाबत नियमांचे पालन व्हावे, असे त्यांनी नमूद केले. डीबीटीद्वारे सुरक्षा साहित्य वितरण, विमा संरक्षण, वेतन वेळेत देणे, पुनर्वसन प्रक्रिया गतीमान करणे, किमान वेतनाचा प्रश्न मार्गी लावणे, पेन्शन व अनुकंपा प्रकरणे तातडीने निकाली काढणे यासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
योजना अस्तित्वात, मात्र योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत
सफाई कामगारांचे प्रश्न कायम आहेत. अनेक ठिकाणी योजना अस्तित्वात असूनही त्या प्रत्यक्षात योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. घरकुल, आरोग्य सुविधा, विमा संरक्षण, किमान वेतन आणि पुनर्वसन, वाढत्या लोकसंख्येनुसार पदनिर्मिती, अनुकंपा, सेवानिवृत्ती वेतन सारख्या मूलभूत बाबी अजूनही प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले. सफाई कामगार हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाचा प्रश्न दुर्लक्षित केला जाणार नाही. संबंधित यंत्रणांना तातडीने कामगिरी सुधारण्याचे निर्देश दिल्याचे ते म्हणाले.
