सुरक्षित वीज पुरवठय़ावर महावितरणचा भर

शाळेजवळचे रोहित्र, धोकादायक उघडय़ा वाहिन्यांना हटवणार

  • शाळेजवळचे रोहित्र, धोकादायक उघडय़ा वाहिन्यांना हटवणार
  • महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांचे मत
  • लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूरच्या रस्त्यावरील वीज खांब, खुल्या वीज वाहिन्या, शाळेजवळील रोहित्र अशा संभाव्य अपघाताची ३०० ठिकाणे टप्प्याटप्प्याने हटवून नागरिकांना सुरक्षित वीजपुरवठा केला जाईल. त्याकरिता वेळोवेळी निधी मिळत आहे, असे मत महावितरणचे नागपूरचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी व्यक्त केले.

खंडाईत यांनी लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान महावितरणच्या संबंधित विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली. जुन्या नागपूरचा विचार केल्यास २० ते ३० वर्षांपूर्वी छोटे शहर, लहान बोळ्या, रस्ते असे दृश्य होते. त्यावेळी महावितरणने नागरिकांना अखंड वीजपुरवठा देण्याकरिता रस्त्यांच्या बाजूने वीज वाहिन्या टाकल्या. कालांतराने शहराची लोकसंख्या वाढली. रस्ते मोठे झाले. त्यामुळे वीज खांब रस्त्यावर आले. त्यातून समस्या सुरू झाल्या. काही बिल्डर आणि नागरिकांनी वीज तारांना खेटून नियमबाह्य़ बांधकाम केले. वाहिन्यांजवळ नवीन खासगी शाळा व महाविद्यालये सुरू झाली. त्यामुळे उघडय़ावरील वाहिनीला स्पर्श होऊन अपघाताची संख्या वाढली. नागपूरच्या सुगतनगर येथील दोन भाऊ आणि हिंगणा येथील एका मुलाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हा प्रश्न ऐरणीवर आला. भविष्यातील असे अपघात टाळण्याकरिता महावितरण, नागपूर महापालिका आणि विविध सामाजिक संघटनांसह नागरिकांनीही एकत्रित काम करण्याची गरज आहे. महापालिकानेही वाहिनी टाकताना घेतले जाणारे रस्ते कटिंग शुल्क कमी करायला हवे. सोबत वीज वाहिनीला लागून असलेल्या वस्त्यांमधील नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे, असे  भालचंद्र खंडाईत म्हणाले.

अपघात टाळण्याकरिता

  • वेळोवेळी घरातील अर्थिग तपासावे
  • गुरे-ढोरे विजेच्या उपकरण वा खांबाला बांधू नये
  • आयएसए मार्क उपकरणे वापरावी
  • वीज यंत्रणा असलेल्या भिंतीला ओलावा येऊ देऊ नये
  • कुलर, वातानुकूलित यंत्र किंवा इतर उपकरण वेळोवेळी तपासावे

..तर धोकादायक ठिकाणी एबी केबलचा पर्याय

वीजचोरी होत असलेल्या भागात महावितरणकडून सध्या विशिष्ट प्लास्टिक कोटिंग असलेली एबी केबल टाकली जाते. त्यामुळे अनेक भागात वीजचोरी कमी झाली आहे. शहरातील उघडय़ा वाहिन्या असलेल्या धोकादायक भागात वीज तार खराब झाल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने ती बदलताना प्राधान्याने एबी केबलला प्राधान्य दिले जाईल, असे खंडाईत म्हणाले.

भूमिगत वाहिनीचा प्रति किमी खर्च २५ लाख

उघडय़ा वीज वाहिनीसाठी प्रति किमी ५ लाख आणि भूमिगतसाठी २५ लाख रुपयांचा खर्च येतो. ग्राहकाला वीजपुरवठा करणे महावितरणचे प्राथमिक कार्य आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या निधीतून हा अतिरिक्त भार उचलण्याची गरज आहे. जेणेकडून सगळ्यांना वीज देण्यासह सुरक्षित वीज देणे शक्य होणार असल्याचे खंडाईत म्हणाले.

भूमिगत वाहिनीकरीता स्वतंत्र कॉरिडॉर असावे

नागपूर किंवा कोणत्याही भागात रस्ते किंवा इतर विकासात्मक कामे करताना भूमिगत केबल कुठून गेली याची माहिती यंत्रणांना नसते. स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक कंपनीला स्वतंत्र कॉरिडॉर देण्याची गरज आहे. ते नसल्यामुळे शहरात सध्या विजेचे केबल वारंवार कापले जाण्याच्या घटना पुढे येत असून त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. घटनेनंतर विविध यंत्रणा बसून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी हे काम सगळ्या यंत्रणा एकत्र येऊन सुटू शकत असल्याचे खंडाईत म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Safe power supply in nagpur

ताज्या बातम्या