नागपूर : सह्याद्री व्याघ्रप्रकल्प परिसरात स्थायी होणाऱ्या वाघांची संख्या वाढत असली तरीही वाघिणीसाठी मात्र इतर व्याघ्रप्रकल्पांकडेच मागणी करावी लागत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून दोन व पेंच व्याघ्रप्रकल्पातून एक अशा तीन वाघिणी सह्याद्रीत सोडण्यात आल्या. मात्र, वाघांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असल्याने या व्याघ्रप्रकल्पाला आणखी वाघिणीची प्रतिक्षा आहे.
येथे वाघ स्थिरावत आहेत
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात काही वर्षापूर्वीपर्यंत वाघ येत असले तरीही ते स्थिरावत नव्हते. मात्र अलीकडच्या तीन ते चार वर्षात याठिकाणी वाघांची संख्या स्थिरावू लागली आहे. सह्याद्रीत नैसर्गिकरित्या स्थलांतर होऊन स्थायिक होणाऱ्या वाघांची संख्या आता सात झाली आहे. त्यामुळे या व्याघ्रप्रकल्पात वाघांच्या वंशवृद्धीसाठी पाच वाघीण व तीन वाघ सोडण्याचा निर्णय झाला. त्यासाठी केंद्राने देखील परवानगी दिली. याअंतर्गत आतापर्यंत ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून दोन तर पेंच व्याघ्रप्रकल्पातून एक वाघीण सह्याद्रीत सोडण्यात आल्या.
वाघ संख्या वाढल्यास पर्यटन वाढ
वाघांची संख्या वाढत असल्यामुळे सह्याद्रीत आता वाघिणींची आवश्यकता आहे. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात पाच वाघ आणि तीन स्थलांतरित वाघिणी आहेत. तर राधानगरी वन्यजीव अभयारण्यात तीन वाघांची नोंद आहे. त्यामुळे राधानगरीत वाघ सोडल्यास त्याठिकाणी वाघ, वाघिणीचे मिलन होऊन वंशवृद्धीची शक्यता आहे. जन्माला आलेल्या बछड्यांचे पुढे सह्याद्रीकडे स्थानांतरण होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे त्या भागात स्थिर वाघसंख्या निर्माण होण्यास मदत होईल. याठिकाणी वाघांची संख्या वाढल्यास पर्यटनाला देखील वाव मिळेल. त्यामुळे नव्याने निसर्ग पर्यटन व रोजगार वाढेल.
रायबा, सरदार आणि आता राणोजी
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात आणखी एका नवीन वाघाची नोंद झाली आहे. या वाघाचे अधिकृत नाव ‘एसटीआर-१०’ असे आहे. तर ‘राणोजी’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. तर अलीकडील काळात राधानगरी वन्यजीव अभयारण्य मध्ये दोन नर वाघांच्या अस्तित्वाबाबत माहिती समोर आली असून त्यासंबंधी वन विभागाकडून सखोल पडताळणी करण्यात आली. नियमित गस्तीदरम्यान तसेच कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या पुराव्यांवरून ‘एसटीआर-०७’ आणि ‘एसटीआर-०८’ असे त्यांचे अधिकृत नामांकन करण्यात आले आहे. तर ‘रायबा’ आणि ‘सरदार’ असे त्यांचे नामकरण करण्यात आले आहे.
वन्यजीव अभ्यासकांची मागणी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी पाच मादी वाघांच्या स्थलांतरणाला केंद्राने आधीच परवानगी दिली आहे. त्यातील तीन वाघिणी स्थलांतरीत देखील करण्यात आल्या आहेत. मात्र, आता ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून एक वाघीण राधानगरीत स्थलांतरित करण्याचा विचार योग्य ठरेल. यामुळे राधानगरीतील विद्यमान नर वाघांसोबत प्रजनन होऊन त्या भागात स्थिर वाघसंख्या निर्माण होण्यास मदत होईल. या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करावा, अशी विनंती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम.एस. रेड्डी यांना केली आहे.
