नागपूर : ज्या व्याघ्रप्रकल्पात कधीकाळी वाघ स्थिरावत नव्हते, त्या व्याघ्रप्रकल्पात आता वाघांची मांदियाळी दिसू लागली आहे. गेल्या तीन वर्षात या व्याघ्रप्रकल्पात दोन ते तीन वाघ स्थिरावले. त्यांच्यासाठी आता वाघिणी पण सोडण्यात येत आहेत. मात्र, आता आणखी एक आनंदाची वार्ता या व्याघ्रप्रकल्पाने दिली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अजून एका नवीन वाघाची नोंद झाली आहे. या नवीन वाघाला “STR T9” असा सांकेतिक नंबर देण्यात आला आहे.

हा नवीन वाघ हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात गेले दोन महिने झाले विविध कॅमेरा ट्रॅप मध्ये दिसून आला आहे. त्याचे विविध फोटो व व्हिडिओ कॅमेरा मध्ये आले आहेत. सध्या हा T9 वाघ तारा T5 च्या टेरिटरी मध्ये तिच्या मागे फिरत आहे. स्थानिक गाईड मंडळी यांनी त्याचे नामकरण “शिलेदार” असे केले आहे. आता ह्या वाघामुळे सह्याद्री मध्ये एकूण वाघ संख्या सात झाली आहे. T1 सेनापती, T2 सुभेदार, T3 बाजी, T4 चंदा, T5 तारा, T6 हिरकणी, T9 शिलेदार अशी वाघांची नावं आहेत. त्यामुळे कधीकाळी वाघ न स्थिरावणाऱ्या सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढत आहे आणि व्याघ्रप्रकल्पाच्या दृष्टीने हा एक सकारात्मक संकेत मानला जात आहे.

गिरीश पंजाबी, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, डब्ल्यूसीटी म्हणतात..

सह्याद्री कोकण टायगर “SKT 21” या वाघाचे पहिल्यांदा छायाचित्र डिसेंबर २०२४ मध्ये सावंतवाडी वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅप ला काढण्यात आले. त्याने एका गुराची शिकार केली होती. त्यानंतर तो दाजीपूरमध्ये जानेवारी २०२५ मध्ये कॅमेरा ट्रॅपमध्ये छायाचित्रित झाला. यावरून तो टायगर कॉरिडॉरमधून उत्तरेकडे गेला हे दिसून आले. आता तो जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये STR मध्ये रेकॉर्ड झाला. हा एक तरुण नर वाघ आहे आणि योग्य प्रदेश शोधण्यासाठी स्थलांतर करत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारा कॉरिडॉर वाघ संरक्षणासाठी किती महत्त्वाचा आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

तुषार चव्हाण, क्षेत्रसंचालक म्हणतात..

सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील T5 (तारा) ह्या वाघिणीच्या क्षेत्रात तीन नर वाघ T1 सेनापती , T 2 सुभेदार, व नव्याने आलेला T 9 शिलेदार हे तीन वाघ फिरत आहेत.

आता तारा कोणाला निवडते हे पाहावे लागेल.

रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक म्हणतात..

ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा साठी अत्यंत आनंदाची बातमी असून ह्या मुळे सह्याद्री मधील असलेली जैवविविधता अधोरेखीत होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ला जोडणाऱ्या राधानगरी तसेच तिलारी दोडामार्ग येथील जंगल क्षेत्र कॉरिडॉर ह्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका वाघांच्या प्रजनन साठी पार पाडीत आहेत.