बुलढाणा : तालुक्यातील सैलानी बाबा दर्गा येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. कमी अधिक एक महिना चालणारी ही यात्रा महाराष्ट्र राज्यातील मोठ्या यात्रेपैकी एक असून यात्रा काळात ४ लाखाच्या आसपास आबालवृद्ध भाविक यात्रेकरिता डेरेदाखल होतात. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या स्थळी राज्यासह देशभरातील मुस्लिम हिंदू धर्मीय भाविक येतात.

या पार्श्वभूमीवर यंदा पार पडणाऱ्या सैलानी बाबा दर्गा येथील ११९ व्या उरूस महोत्सवासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. जवळपास एक महिना चालणाऱ्या या यात्रेचे, नारळाची होळी (२ मार्च ), पिंपळगाव सराई येथून निघणारा संदल (८ मार्च ) आणि १२ मार्चला होणारी फातेहखानी हे तीन मुख्य दिवस आहे. या यात्रेची जय्यत तयारी करण्यात येत असून यात्रा महोत्सवाच्या काळात होणारी भाविकांची अलोट गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता दक्षता घेण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किरण पाटील यांनी वाहतूक मार्गांत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. २५ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२६ या कालावधीत हे बदल वजा निर्बंध लागू राहतील. बुलढाणा जिल्ह्यासह देशभरातून येणाऱ्या भाविकांना, खाजगी, जड वा शासकीय वाहनाना या पर्यायी मार्गानेच वाहतूक करणे बंधनकारक आहे.

२५ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत यात्रा महोत्सव साजरा होत असून या पार्श्वभूमीवर अंदाजे ४ते ५लाख भाविक सैलानी येथे येणार असा प्रशासनाचा अंदाज आहे . त्यानुसार पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या विनंतीनुसार जिल्हा दंडाधिकारी यांनी सैलानीकडे येणाऱ्या जिल्हा वाहतूक मार्ग क्रमांक २६ वरील वाहतुकीला अन्य मार्गानी वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.

असे आहेत पर्यायी मार्ग

नियमित मार्ग रायपूर – पिंपळगाव सराई – सैलानी – ढासाळवाडी – दुधा असा असून पर्यायी मार्ग रायपूर – मातला – केसापूर – माळवंडी – दुधा असा आहे. सध्याचा मार्ग दुधा – घाटनांद्रा – ढासाळवाडी – सैलानी – पिंपळगाव सराई असा असून पर्यायी मार्ग दुधा – माळवंडी – केसापूर – मातला – रायपूर असा करण्यात आला आहे.

या कालावधीत एस.टी. बसेस, जड वाहतूक तसेच खाजगी वाहतूक यांना या पर्यायी मार्गाचाच वापर करणे बंधनकारक राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३१ अन्वये कारवाई करण्यात येईल.

अपर पोलीस अधीक्षकांची पाहणी

सर्व जाती धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबा यात्रा येथे दरवर्षी लाखो भाविक सैलानी येथे दाखल होत असतात. सैलानी बाबा यांची यात्रा तोंडावर आल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करीता प्रशासनाने वेळोवेळी सर्व विभागाच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे.घेण्यात आल्या आहेत.

अपर पोलीस अधीक्षक (बुलडाणा) अमोल गायकवाड यांनी सैलानी परिसरात भेट देऊन विविध स्थळांची पाहणी केली. त्यांच्या समवेत रायपूर ठाणेदार निलेश सोळंके, तत्कालीन ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी पिंपळगाव सरांई येथे संदल घर तसेच संदल मिरवणूकीच्या मार्गाची पाहणी करून मिरवणूकीच्या मार्गात असलेल्या अडचणी दूर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सैलानी बाबा दर्गा येथे भेट देऊन सिसिटीव्ही , दर्शन रांग यांचे योग्य नियोजन करून तसेच योग्य बंदोबस्त नेमण्याचे आदेश दिले.

कोणतीही दुर्घटना घडू नये या बाबत ठाणेदार निलेश सोळंके यांना सूचना देण्यात आल्या. पारंपरिक नारळ होळी ठिकाण, झिरा परिसर तसेच भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या वाहनतळाची पाहणी केली. त्यांनी पिंपळगाव सरांई येथील सरपंच तरमले, पोलीस पाटील रामेश्वर गवते, सैलानी येथील शफिक मुजावर, रशीद मुजावर आदि सोबत चर्चा केली.