नागपूर : सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवारी नागपूरमध्ये राष्ट्रचिंतन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रीय चिंतक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. नागपूरमधील शुक्रवारी तलाव परिसरातील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात व्याख्यान पार पडले. यावेळी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी सनातन धर्माचा खरा अर्थ उलगडला. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे भारतीय पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि सार्वजनिक वक्ते म्हणून ओळखले जातात. ते विशेषतः इस्लाम, काश्मीर प्रश्न आणि हिंदू राष्ट्रवाद या विषयांवर आपले विचार मांडतात. त्यांच्या विचारांमध्ये स्पष्टपणे राष्ट्रवादी आणि हिंदुत्वाभिमुख भूमिका दिसून येते. त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात अलीगढमधील लॉर्ड मिन्टो सर्कल स्कूलमध्ये केली आणि पुढे अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून राजकारणशास्त्रात पदवी तसेच पत्रकारितेचे शिक्षण घेतले.

पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी विविध माध्यमांमध्ये काम केले असून, एका काळी ते पाकिस्तानी चॅनेलसाठी भारत प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी काही काळासाठी प्रेस क्लब ऑफ इंडियाचे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले. कुलश्रेष्ठ हे देशभरात विविध कार्यक्रमांमध्ये व्याख्याने देतात, जिथे ते “सनातन धर्माचे शाश्वतत्व” आणि “भारताची अखंडता” या विषयांवर ठामपणे भाष्य करतात. त्यांच्या भाषणांमधून हिंदू संस्कृतीबद्दल अभिमान व्यक्त होत असला तरी, अनेकदा त्यांच्यावर मुस्लिम समाजाविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केल्याचे आरोप झाले आहेत. काही संस्था आणि माध्यमांनी त्यांच्या वक्तव्यांना ‘हेट स्पीच’ म्हणून वर्णन केले आहे, तर समर्थक त्यांना “निर्भय राष्ट्रवादी आवाज” मानतात. त्यामुळे त्यांच्या कार्यावर आणि विचारांवर दोन भिन्न मते आढळतात — एकीकडे त्यांना सत्य बोलणारा निर्भय पत्रकार म्हटले जाते, तर दुसरीकडे त्यांच्यावर धार्मिक द्वेष वाढवण्याचा आरोप होतो. त्यांच्या भाषणांचा सामाजिक आणि राजकीय परिणाम लक्षात घेता, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे वादग्रस्त पण प्रभावी व्यक्तिमत्त्व मानले जाते. त्यांचा उद्देश भारताची ओळख, संस्कृती आणि इतिहास यांचे पुनरावलोकन करून राष्ट्रभावना जागवणे असा असल्याचे ते स्वतः सांगतात. नागपूरमध्ये आयोजित व्याख्यानातही त्यांनी अनेक विषयांवर वक्तव्य केले.

काय म्हणाले कुलश्रेष्ठ?

व्याख्यात कुलश्रेष्ठ म्हणाले की सर्व धर्म समान आहे,हे सर्वात मोठे थोतांड आहे. ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून ते अंतापर्यंत सनातन धर्मच शाश्वत आहे. इतर सारे पथ आहेत. काळानुसार यातील पूजा पद्धती बदलत असतात. काळानुसार सत्तांतरेही होतात, न्यायालयेही बदलतात, मात्र सनातन धर्म सारखाच राहतो. मंदिरातील पुजारी कोणत्याही संविधान, पुस्तकाशी बांधलेला नाही. मंदिरात चार लोक आले की चारशे, त्याची पूजा करण्याची पद्धत सारखीच असते.