अनिल कांबळे

नागपूर : उपराजधानीत नवजात बाळाची विक्री करणाऱ्या अनेक टोळय़ा कार्यरत असून यापूर्वी एका टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असतानाच आता आणखी नव्या टोळीचा छडा पाचपावली पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळय़ा शहरात कार्यरत असल्याची वृत्तमालिका ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केली होती, हे विशेष.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने (एएचटीयू) शहरातील नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळय़ांना लक्ष्य केले होते. एका टोळीतील बोगस डॉक्टरसह चौघांना अटक केली होती.  पुन्हा एक टोळीवर त्यांचे लक्ष होते. त्या टोळीला अटक करण्यात पाचपावली पोलिसांना यश आले असून उत्कर्ष दहीवले (२२, राणी दुर्गावती चौक, पाचपावली) आणि उषा सहारे (३५, इमामवाडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मूळचे भंडाऱ्यातील असलेले उत्कर्ष आणि त्याची पत्नी ईश्वरी (२५) हे मोलमजुरी करण्यासाठी नागपुरात आले. गेल्या महिनाभरापूर्वी त्यांना मुलगी झाली.  बाळ विक्री करणाऱ्या टोळीतील सदस्य उषा सहारे हिने लगेच उत्कर्षची माहिती गोळा केली आणि त्याला गाठले.

त्याला नवजात मुलीची विक्री केल्यास एक लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. दारूडा आणि कर्जबाजारी असलेल्या उत्कर्षने उषाला होकार दिला. सावज जाळय़ात अडकताच उषाने लगेच एका धनाढय़ ग्राहक दाम्पत्याचा शोध घेतला. 

असे शोधतात सावज..

नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळीत खासगी अनाथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उषा ही एका अनाथालयाची कर्मचारी आहे. ती गरजू आणि गरीब दाम्पत्यांचा शोध घेऊन नवजात बाळाचा सौदा करते व मुलबाळ नसलेल्या दाम्पत्यांना लाखो रुपये घेऊन बाळ विकते. तिने आतापर्यंत अनेक बाळ विक्री केल्याचा पोलिसांनी संशय आहे.

धनाढय़ दाम्पत्याच्या हाती बाळ

उषाने शासकीय नोकरीत असलेल्या एका दाम्पत्याला हेरले. त्या दाम्पत्याने बाळ विकत घेण्याची तयारी दर्शवली. दाम्पत्याकडून ३ ते ५ लाख रुपये घेऊन त्या बाळाची विक्री करण्यात आली. याप्रकरणी बाळाची आई ईश्वरी हिच्या तक्रारीवरून पाचपावलीच्या उपनिरीक्षक मीनाक्षी काटोले, छगन शिंगणे आणि गीता कोपरकर यांनी गुन्हा दाखल केला असून नवजात बाळाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आईकडून बाळ हिसकावले

उत्कर्षने एक लाख रुपयात बाळ विक्रीचा सौदा केला आणि १३ एप्रिलला बाळ ताब्यात देण्याचे ठरवले. दुसरीकडे बाळाची आई ईश्वरी ही बाळ विक्रीसाठी तयार नव्हती.  ती व्याकूळ झाली. उत्कर्षला पत्नी आणि बाळासह टीबी वार्डातील एका घरी बोलावण्यात आले. तेथे  ७० हजार रुपयांचा पहिला हप्ता देताच उषाने ईश्वरीचे स्तनपान करीत असलेल्या  बाळाला अक्षरश: हिसकावून घेतले.