मुंबईत चोरलेल्या चार कोटींच्या सोने, चांदीची यवतमाळमध्ये विक्री; सराफा व्यावसायिक ताब्यात

या व्यवहारात यवतमाळ येथील दोन सराफा व्यावसायिक अडचणीत आले आहेत

मुंबईत चोरलेल्या चार कोटींच्या सोने, चांदीची यवतमाळमध्ये विक्री; सराफा व्यावसायिक ताब्यात
संग्रहित छायाचित्र

मुंबईतील सराफा बाजारातील सोने, चांदी चोरून ते यवतमाळमधील सराफा व्यावसायिकांना विकण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे दिसून येत आहे. याच प्रकरणात आता तब्बल चार कोटी रुपयांच्या दीड किलो सोने व ३५ किलो चांदी खरेदीच्या व्यवहारात यवतमाळ येथील दोन सराफा व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मुंबई पोलिसांनी शनिवारी यवतमाळ येथे दाखल होत यातील एका व्यापाऱ्याला ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील सराफा बाजारातून चोरलेल्या दीड किलो सोने व ३५ किलो चांदीच्या शोधात शनिवारी हे पथक यवतमाळात पोहोचले. त्यांनी सोबत आणलेल्या गुन्ह्यातील आरोपीने येथील दोन सराफांची दुकाने पोलीस पथकाला दाखविली. यातील एका सराफाला मुंबईच्या पथकाने ताब्यात घेतले. मुंबईत सराफा व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास चार कोटींच्या सोन्याचा अपहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर, नात्यातील व्यक्तीनेच हा अपहार केल्याचा आरोप आहे.

मोठ्या शहरांमधील चोरीचा मुद्देमाल यवतमाळमध्ये –

तेवाईकाने चोरलेले सोने यवतमाळमधील दोन सराफा व्यावसायिकांना विकल्याची कबुली आरोपीने दिली आहे.हा आरोपी २०२१ पासून यवतमाळातील सराफा व्यापाऱ्यांना चोरीचे सोने व चांदी कवडीमोल भावात विकत असल्याचा संशय आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईतील सहायक पोलीस निरीक्षक व इतर तीन कर्मचाऱ्यांच्या पथकाने यवतमाळच्या तुलसी ज्वेलर्स व लष्करी ज्वेलर्सची झडती घेतली. यातील एका सराफाला ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले. शनिवारी सकाळपासून ही कारवाई सुरू होती. मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारीही आहेत. मोठ्या शहरांमधील चोरीचा मुद्देमाल यवतमाळातील सराफा व्यापारी हमखास घेतात, असे खात्रीने सांगितले जाते.

पोलीस अधिकाऱ्याने राजकीय दबाव झुगारला! –

चोरीचे प्रकरण अंगलट आले तर राजकीय व पोलिसांसोबतचे हितसंबंध वापरून प्रकरणात ‘सेटलमेंट’ केली जात असल्याने यवतमाळला हा व्यापार वाढल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी थांबवावी यासाठी येथील एका आमदाराच्या भावाने पोलीस ठाण्यात बराच वेळ ठिय्या दिला होता. त्याने आमदार भावाशीही मुंबईहून आलेल्या तपास अधिकाऱ्याचे बोलणे करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा पोलीस अधिकारी या राजकीय दबावाला जुमानला नाही.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sale of stolen gold and silver in mumbai worth four crores in yavatmal msr

Next Story
पुणे : बागेत खेळणाऱ्या मुलाला पाळीव श्वान चावले; श्वानाच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल
फोटो गॅलरी