गोंदिया जिल्ह्यात आमगाव येथील ‘रिया फ्युएल स्टेशन’ या नावाने असलेल्या ‘ऐसार’ कंपनीच्या पेट्रोल पंपवर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ग्राहकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरले. परंतु, काही अंतरावर गेल्यानंतर वाहने बंद पडत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. वाहन चालकांनी वाहने मेकॅनिककडे तपासल्यावर टँकमध्ये पेट्रोल नसून पाणी असल्याचे पुढे आले. यावर वाहनधारकांनी पेट्रोलपंपवर धाव घेऊन तपासले असता पेट्रोल ऐवजी पाणीच विक्री होत असल्याचे निदर्शनास आले.

अनेक वाहनधारकांनी विक्री होत असलेले हे पेट्रोल बाटलीत घेतले व पाहणी केली तर त्यात पेट्रोलच्या ऐवजी सरळ पाणीच विक्री होत असल्याचे दिसून आले. ग्राहकांची तक्रार व गर्दी वाढत गेली. यावेळी तक्रार करूनही विक्री सुरूच होती. अखेर तहसीलदार व पेट्रोल कंपनीच्या टोलफ़्री क्रमांकावर तुलाराम मारबते, हर्षल चुटे, दीपक पटले, दिलीप गिरी, विलास लिल्हारे, महेश पटले, किशोर तुरकर या ग्राहकांनी तक्रार करताच तहसील अधिकारी यांनी पंचनामा करून पंप बंद केला. परंतु पंपचालकाने सायंकाळी ४ वाजेपासून ६ वाजेपर्यंत पेट्रोल ऐवजी पाण्याची विक्री करून मात्र वाहनधारकांची लूट केली. यासंदर्भात पेट्रोल पंपावर असलेले कर्मचारी महेंद्र भेलावे आणी दिनेश हत्तीमारे यांना विचारणा केली असता त्यांनी काहीही माहिती नसल्याचे सांगितले, तर एजेंन्सीचे संचालक मालक संजय बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही याबाबत काहीच माहिती दिली नाही़