देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण असतानाच रामटेक येथील पिता-पुत्राच्या जोडीने अभिनव सायकलस्वारीच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीरांना केलेले अभिवादन वाखाणण्याजोगे आहे. सलग २४ तासात ५०० किमीपेक्षा अधिक अंतर सायकल चालवून ऋषिकेश आणि प्रथमेश किंमतकर या पिता-पुत्राने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक ते यवतमाळ आणि परत यवतमाळ ते रामटेक असा प्रवास या दोघांनी २४ तासांत पूर्ण केला. रविवारी सकाळी रामटेक येथून त्यांची सायकलस्वारी सुरू झाली. नागपूर, पवनार, सेवाग्राम, वर्धा, कळंब असा प्रवास करीत रात्री ८ वाजता ते यवतमाळ येथे पोहचले. या ठिकाणी यवतमाळ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, अवधुतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी यवतमाळ सायकल क्लबचे सदस्य दिलीप राखे, मनीष गुलवाडे, प्रणय जैन, पेमेंद्र रामपूरकर, तुषार पद्मावार, कपिल श्यामकुवर आदी उपस्थित होते.

सायकल क्लबच्या सदस्यांनी किंमतकर पिता-पुत्रासोबत शहराच्या सीमेवरून सायकलस्वारी केली. स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यासाठी ही सायकलस्वारी केल्याचे ऋषिकेश आणि प्रथमेश किंमतकर यांनी सांगितले.

यवतमाळ येथून त्यांनी रात्रीच परतीचा प्रवास सुरु केला. आज सोमवारी सकाळी नागपूर येथे पोहचल्यानंतर अंबाझरी येथे त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले. तेथून ते रामटेककडे रवाना झाले. या प्रवासात त्यांच्या सोबत डॉ. अंशुजा किंमतकर व सहकारी सहायक म्हणून सहभागी झाले होते. या पिता-पुत्राने नागपूरपासून भर पावसात हा संपूर्ण सायकल प्रवास केला, हे विशेष.