नागपूर: महावितरण आणि राज्य शासन  प्रीपेड मीटरच्या मार्गाने विनाकारण आर्थिक लूट करणारा आणि खाजगीकरणाला प्रोत्साहन देणारा निर्णय घेत आहे. त्या निर्णयाच्या विरोधात मंगळवारपासून (२ जुलै) संपूर्ण राज्यभर समाजवादी पार्टीने  आंदोलनाची घोषणा केली आहे.महावितरण  आणि राज्य शासनाने राज्यातील सर्व सव्वादोन कोटी वीज ग्राहकांकडे स्मार्ट  मीटर्स लावणार अशी घोषणा केली. वास्तविक दरमहा ३०० युनिट्सपेक्षा कमी वीजवापर करणाऱ्या सर्वसामान्य २ कोटी ५ लाखांहून अधिक ग्राहकांना या   मीटरची गरजच नाही. तरीही   सर्वसामान्य वीज ग्राहकांवर किमान २५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा लादण्यात येणार आहे.

महावितरणकडून या रकमेची परतफेड ग्राहकांना किमान ३० पैसे प्रति युनिट दरवाढीच्या रूपाने करावी लागणार आहे. सध्याचे २ हजार ६०० व ४ हजार रुपये दराचे मीटर स्मार्ट, पुरेसे व  सुस्थितीत असतानाही हे १२ हजार रुपयांचे स्मार्ट मीटर्स केवळ खाजगीकरणास मदत करण्यासाठी आणि राज्यात येणाऱ्या खाजगी वितरण परवानाधारकांच्या सोयीसाठी लावण्यात येत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला आहे. ग्राहकांवरील हा अनावश्यक भुर्दंड रद्द झाला पाहिजे आणि त्याचबरोबर दुप्पट दराने मंजूर करण्यात आलेल्या टेंडर्सची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी  करण्यात आली आहे. त्याचबरोबर तातडीने येत्या आठ दिवसांत राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदा घेण्यात येतील. पार्टीच्या वतीने व विविध स्थानिक संघटनांच्या वतीने राज्य सरकारला इशारा निवेदन देण्यात येईल. सरकारला जागे करण्यासाठी संपूर्ण राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये आणि शक्य त्या तालुक्यांच्या ठिकाणी  आंदोलन करण्यात येईल, असाही निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत समाजवादी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली.

हेही वाचा >>>चामुंडी कंपनी स्फोटातील बळींची संख्या आठवर, जखमी कामगाराचा मृत्यू , एकावर उपचार

त्यात पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, प्रधान महासचिव परवेझ सिद्दिकी, महासचिव डॉ. अब्दुल राऊफ, डॉ. विलास सुरकर, राहुल गायकवाड,  साजिदा निहाल अहमद, कल्पना गंगवार, अनिस अहमद यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस रमेश शर्मा, दीपक चिमणकर, लियाकत खान, याकुब पठाण, फैसल खान, हैदर पटेल, जावेद खान, इब्राहिम खालिक, फारुक पाशा, नबी सिपोराकर, शाहूराज खोसे, नामदेव तिकटे, ॲड. शिवाजी कांबळे, अफजल पठाण, रईस बागवान, गुड्डूभाई काकर, मुस्तकीम डिग्निटी, शानेहिंद निहाल अहमद, इमरान चौधरी, साधना शिंदे, बी डी यादव, सहदेव वाळके, दिलावर खान, विष्णू गोडबोले, बब्बू खान, अबू डोंगरे, मुकुंद माळी, जितेंद्र सतपाळकर, प्रकाश लवेकर, कुमार राऊत इत्यादी राज्यातील विविध जिल्ह्यांतील प्रमुखांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी समाजवादी पक्षाने राज्यातील विधानसभेच्या ३५ जागा लढवण्याचीही घोषणा केली.