|| महेश बोकडे

नागपुरात दोन दिवसांत अहवाल, पुण्यात सात दिवसांची प्रतीक्षा

नागपूर : उपराजधानीतील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत (निरी) जनुकीय चाचणीची सोय असतांनाही विदर्भातील ओमायक्रॉन संशयितांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत (एनआयव्ही) पाठवले जात आहेत. त्यामुळे अहवालाला विलंब होत असल्याने ओमायक्रॉनवर नियंत्रण मिळणार कसे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यातच आता धूळे येथीलही नमुने नागपूरच्या निरीत येत आहेत. 

नागपुरातील निरी या संस्थेत  महापालिकेसह स्थानिक प्रशासनाने प्रयत्न केल्याने जनुकीय चाचणीची सोय लवकर झाली. तेथे ऑक्टोबर २०२० पासून ही चाचणी सुरू झाली. नागपुरात डेल्टा विषाणूही या प्रयोगशाळेनेच शोधून काढला.  दुबईतून नागपुरात आलेल्या दुसऱ्या रुग्णाला ओमायक्रॉन असल्याचेही याच प्रयोगशाळेत स्पष्ट झाले. त्यानंतरही नागपूर महापालिकेसह विदर्भातील नमुने पुण्याच्या एनआयव्ही या प्रयोगशाळेतच पाठवले जात आहेत.  नागपुरात दोन दिवसांत त पुण्यात तीन ते सात दिवसांत अहवाल मिळतो.  ओमायक्रॉन असल्याचा अहवाल उशिरा कळल्यावर  रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांना गाठण्यास महापालिकेला आणखी अवधी लागतो. त्यामुळे रुग्णसंख्या वाढू शकते. 

२५ डिसेंबरपर्यंत निरीत १९० नमुन्यांची चाचणी

निरीच्या प्रयोगशाळेत २५ डिसेंबरपर्यंत १९० नमुन्यांची जनुकीय चाचणी झाली. यापैकी एकाला ओमायक्रॉन असल्याचे स्पष्ट झाल्याची सूत्रांची माहिती आहे.  नागपूर महापालिकेकडून येथे विदेशात प्रवासाचा इतिहास असलेल्यांपैकी केवळ दोन नमुने देण्यात आले असून यापैकी एकाला ओमायक्रॉनचे निदान झाले आहे.

शासनाच्या सूचनेनुसार कारवाई 

निरीमध्ये महापालिकेच्या प्रयत्नातूनच जनुकीय चाचणी सुरू झाली. परंतु महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार तुर्तास पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत सर्व नमुने पाठवले जात आहेत. तेथूनही दोन- तीन दिवसांतच अहवाल मिळत आहे. पुण्याच्या संस्थेने नमुने घेण्यास नकार दिल्यास नागपूरच्या निरी येथे नमुने  दिले जातील.

– डॉ. संजय चिलकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, नागपूर महापालिका.