अमरावती: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आज तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावत्या पिकअप वाहनाचे पुढील एक चाक अचानक निघाल्याने वाहन अनियंत्रित होऊन महामार्गावर उलटले. या अपघातात ९ मजूर गंभीररीत्या जखमी झाले, तर ८ जण किरकोळ जखमी झाले. सर्व १७ जखमींना उपचारासाठी धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमका अपघात कसा घडला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील २३ मजूर कामाच्या शोधासाठी बुलढाण्याकडे एमएच ३७/ टी ४१८३ क्रमांकाच्या महिंद्रा पिकअप वाहनातून जात होते. आज सकाळी मुंबईच्या दिशेने चॅनेल क्रमांक १२७ जवळ अचानक पिकअप वाहनाचा पुढील डाव्या बाजूचा टायर निघाला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगातील पिकअप वाहन महामार्गावर उलटले. या पिकअपमधून एकूण २० जण प्रवास करीत होते.

पोलिसांचे मदतकार्य

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले आणि जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. या अपघातात ९ मजूर गंभीररीत्या जखमी झाले आहेत. उषा शिवरकर, रीना रामटेके, बंडू उरकुडे, संजय सौंदरकर, शांता सोनवणे, वंदना बुराडे यांचा गंभीर जखमींमध्ये समावेश आहे. या अपघातात ८ जण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाहनचालक ओम पंढरी तनपुरे (वय २६, रा. वाकद, ता. रिसोड) यांच्यासह काही प्रवाशांना सुदैवाने दुखापत झाली नाही.

अपघातग्रस्त वाहन केले बाजूला

अपघातानंतर पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त पिकअप वाहन महामार्गाच्या शोल्डर लेनवर हलविले. घटनास्थळी कठडे व कोन्स लावून वाहतूक सुरक्षित करण्यात आली. तळेगाव दशासर पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस करीत आहेत.

कालच्या अपघातानंतर आज पुन्हा

समृद्धी महामार्गावर गुरुवारी (२ ऑक्टोबर) झालेल्या भीषण अपघातात दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअपला ट्रकने धडक दिल्याने वर्धा येथील ७ भाविकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेच्या धक्क्यातून लोक सावरत असतानाच दुसऱ्याच दिवशी पुन्हा पिकअप वाहनाला झालेल्या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.