वर्धा, आगामी दुर्गा उत्सवासाठी शेगाव येथून दुर्गा मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनाचा आज पहाटे अपघात झाला. त्यात ५ अपघातस्थळीच तर २ दवाखान्याच्या वाटेवर मरण पावले. तर २२ पैकी ३ गंभीर जखमी असून त्यांच्यावर सावंगी येथील रुग्णालयाच्या विविध विभागात उपचार सूरू आहे.
मृतक व जखमी असे
या भीषण अपघातात ७ मृत झाले. घनश्याम पाटील, प्रवीण बकाने, गोलू बादलगवार, ओम गावंडे, दत्ताजी खुरसागे, रोशन राऊत व मुनेश्वर ढोले असे मृत व्यक्ती आहेत. तर दिनेश पांडुरंग नानवटे, सागर मुनेश्वर ढोले, प्रतीक रामदास सिरस्कार, दुर्गेश यशवंत भिसे, अनिल मारोती मसराम, प्रणय प्रभाकर ढोले, यश रवींद्र मलकापूरे, सतीश खाडे, सतीश वसंत राऊत, पवन मोरेश्वर ढोले, नंदकिशोर देविदास सिरस्कार, नरेंद्र प्रल्हाद सोयाम, नयन सुधीर खानझोड, शिवम विकास राऊत, दिनेश रामकृष्ण पोहणकर, अमित शंकरराव ठाकरे, अमित आडे व आर्यन वैद्य हे जखमी आहेत. अशी माहिती रुग्णालयाचे सुशांत वानखेडे यांनी दिली. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. एकास नागपूरला पाठविण्यात येत आहे.
काळाचा असा पडला घाव
ही सर्व तरुण मंडळी २८ तारखेस शेगावला पोहचली होती. बोलेरो पिकअप वाहनाने ३० सप्टेंबर रोजी त्यांचा मूर्तीसह परतीचा प्रवास सूरू झाला. मूर्ती असल्याने वाहन अत्यंत संथ गतीने निघाले होते. अवघी ५ची स्पीड असल्याचे या दुःखद प्रवासातून सुखरूप वाचलेले व सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले शिवम राऊत यांनी लोकसत्तास सांगितले. गावाजवळ पोहचत असतांनाच १२ चाकी अजस्त्र ट्रक या गाडीला वेगात येऊन धडकला. महामार्गाच्या अगदी एका बाजूला आमचे वाहन जात असतांना आमची काहीच चूक नव्हती. मात्र ट्रक धडकला आणि होत्याचे नव्हते झाले, असे रडवेल्या स्वरात राऊत सांगतो.
दरवर्षी समृद्धीनेच प्रवास
या दुर्गा मंडळाचे हे ८ वे वर्ष आहे. गत ५ वर्षांपासून ही मंडळी समृद्धी मार्गानेच मूर्ती घेऊन येत असतात. मूर्ती सोबत असल्याने डोळ्यात तेल घालून व दक्ष राहून प्रवास केल्या जातो. यावेळी १४ फूट उंचीची दुर्गामाता मूर्ती सोबत होती. सर्व ती काळजी घेऊन कंटाळवाना म्हणता येईल असा हा प्रवास भक्तिमय भावनेत सूरू. पण काळ गावाजवळ येऊन वाट बघत आहे, अशी सूतराम शंका कोणास आली नाही. सर्व २० ते २५ या वयोगटातील व विविध व्यवसाय करणारे. या मंडळाचा उत्सव भव्य मूर्ती व विविध उपक्रम असल्याने शहरात लोकप्रिय म्हटल्या जातो.
