अकोला : समृद्धी महामार्गावरून प्रतिबंधित गुटख्याची तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महामार्ग पोलिसांच्या तपासणीदरम्यान ट्रकमधून वास आला आणि कोट्यवधी रुपयांच्या गुटखा तस्करीचा भांडाफोड झाला. तब्बल १.३१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तपासणीदरम्यान धक्कादायक प्रकार उघड

समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई केली. तब्बल १ कोटी ३१ लाख ५१ हजार २५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला. समृद्धी महामार्गावरील कारंजा (लाड) टोल नाका येथे महामार्ग पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू होती. यावेळी महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कृष्ण कन्हैया पवार व पोलीस अंमलदार यांनी संशयित ट्रक (क्रमांक एमएच ४० सीटी २९६४) थांबवून तपासणी केली. वाहनातून गोडसर वास येत असल्याने चालकाकडे सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी वाहनामध्ये तंबाखू सदृश्य पदार्थ असून तो अमरावती येथील जावेद नामक व्यक्तीचा असल्याचे चालकाने सांगितले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कृष्णकन्हैया पवार यांनी तत्काळ ही माहिती महामार्ग पोलीस विभाग वाशीमचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार दांदडे यांना दिली. दांदडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून वाहन कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात ठेवला.

औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत घबाड उघड

पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासन विभागाला पाचारण करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत वाहनातील माल हा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू असल्याचे निष्पन्न झाले. कारंजा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक नितीनकुमार दांदडे, पोलिस उपनिरीक्षक कृष्णकन्हैया पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल इंगोले व पोलीस कॉन्स्टेबल आनंद काकडे यांनी केली.

चाकुच्या धाक्यावर लुटणारे आरोपी गजाआड

अकोला शहरातील येवता टी पॉईट येथे एक दुचाकी चालकाने विक्रमकुमार दुबे यांना सोडून देतो, असे सांगून दुचाकीवर बसवत दूर नेले. काही अंतरावर नेल्यानंतर चाकुचा धाक दाखवून १३ हजाराचा मोबाइल लुटून नेला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून आरोपी मंगेश उत्तमराव वावगे (वय २१ वर्षे रा. महात्मा फुले नगर, नवसारी अमरावती) याला अटक करण्यात आली.