नागपूर : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर बुद्धिमान वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआडीसी) २७ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान मेगाब्लाॅक घेतला गेला आहे. हे काम पूर्ण झाल्यावर येथे १७ प्रकारचे वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनांना ई-चालान दिले जाणार आहे. एप्रिल २०२५ पर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित होण्याचे संकेत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले.

आयटीएमएस यंत्रणेसाठी समृद्धी महामार्गावर दर एक किलोमीटर अंतरावर दिवसा व रात्री वाहतूक निरीक्षण कॅमेरे, स्वयंचलित वाहतूक मोजणी व वर्गीकरण प्रणाली, हवामान निरीक्षण प्रणाली तसेच रस्त्यावर पडलेल्या वस्तू अथवा जनावरांची ओळख पटविणारी शोध प्रणाली बसवली जात आहे. सोबत प्रवाशांना माहिती देण्यासाठी परिवर्तनीय संदेश फलक, वाहन चालित वेग दर्शक प्रणाली तसेच प्रवाशांसाठी संकेतस्थळावर आधारित भ्रमणध्वनी अनुप्रयोग उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर आपत्कालीन वाहनांचा मागोवा व पाठविण्याची व्यवस्था, ड्रोनद्वारे देखरेख प्रणाली, दर दोन किलोमीटर अंतरावर आपत्कालीन कॉल केंद्रे, भ्रमणध्वनी रेडिओ दळणवळण प्रणाली, आपत्कालीन सेवकांसाठी वाहनावर बसविलेले कॅमेरे व अंगावर लावण्याचे कॅमेरे आदी सुविधा पुरविण्यात येत आहे.

महामार्गावर वेग मोजणी रडार व कॅमेरे, वाहन क्रमांक ओळख प्रणाली, लेन शिस्त अंमलबजावणी प्रणाली तसेच चालू स्थितीत वजन मोजून जादा वजन व आकाराच्या वाहनांची ओळख पटविणारी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या प्रणालीमध्ये वेगमर्यादा उल्लंघन, वाहन चालविताना भ्रमणध्वनी वापर, अनधिकृत थांबा, जादा वजन, सीट बेल्ट वापर, लेन शिस्त यांसह एकूण सतरा प्रकारच्या वाहतूक नियमभंगाची ओळख पटविण्याची क्षमता आहे. त्यामुळे या १७ प्रकारच्या वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना स्वयंचलीत पद्धतीने चालान जाणार आहे. एप्रिल अथवा मे २०२५ पर्यंत ही प्रणाली कार्यान्वित होण्याची शक्यता एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर दिली.

सात प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापन केंद्र

समृद्धी महामार्गावरील आयटीएमएस प्रणालींचे नियंत्रण व देखरेख महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापन केंद्रांमधून करण्यात येणार आहे. त्यासाठी एकत्रित वाहतूक व्यवस्थापन केंद्र अमणे येथे उभारण्यात येणार आहे. तर दर शंभर किलोमीटर अंतरावर सेलडोह, धामणगाव, मालेगाव, निधोना, माळीवाडा, शिर्डी व इगतपुरी येथे एकूण सात प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापन केंद्रे असतील. इगतपुरी व अमणे येथे बोगद्यांसाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्थापन केंद्रे कार्यरत राहतील.

२९४ ‘गॅन्ट्री’सह सातशे दोन खांब

महामार्गावर एकूण २९४ गॅन्ट्री (रस्त्यावर उभारलेली लोखंडी वा स्टीलची चौकट किंवा पुलासारखी रचना) व सातशे दोन खांब उभारण्यात येणार आहे. तर सध्याच्या टोल वसुली व्यवस्थेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्यवहार प्रक्रिया वेळ कमी करणाऱ्या प्रणाली बसविण्यात येणार आहे. महामार्गाच्या संपूर्ण लांबीवर दोन्ही बाजूंनी प्रकाशतंतू केबल जाळे उभारण्यात येणार आहे. अखंड जोडणी, भविष्यातील विस्तार व सुधारणा तसेच व्यावसायिक वापरासाठी दुहेरी व्यवस्था ठेवण्यात येईल. टोल नाके व वाहतूक व्यवस्थापन केंद्रे या जाळ्याद्वारे जोडली जाणार आहे.