Samruddhi Mahamarg Accident / बुलढाणा : हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणजे अपघात, अशी व्याख्याच तयार झाली आहे. नियमित अंतराने होणाऱ्या लहान-मोठ्या अपघातांनी हा दृतगती मार्ग लोकार्पणापासूनच वादाचा विषय ठरला आहे. विविध कारणांमुळे या मार्गावर अपघात होत असतात. या अपघातांची दुर्दैवी मालिका अद्यापही कायम आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यात चालकांना अपयश येत असल्याने अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.

एक प्रवासी ठार, तीन गंभीर

रविवारी मध्यरात्री समृद्धी महामार्गावर उभ्या करण्यात आलेल्या ट्रकला कारने मागेहून जोरदार धडक दिली. यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील त्याचे इतर नातेवाईक गंभीर जखमी झाले. आंध्रुड शिवारातील चॅनल क्रमांक २७३.०२ जवळ ही दुर्घटना घडली. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघातात कृष्णा संगीत राठोड (२६, रा. सोमनाथनगर, ता. मानोरा, जि. वाशीम) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

पुण्याहून नागपूरकडे येत होती ट्रॅव्हल्स

ही घटना ताजी असतानाच समृद्धी महामार्गांवर आज, सोमवारी पहाटे भरधाव खासगी बस ट्रकला मागेहून धडकली. बाबा ट्रॅव्हल्सची भरधाव खासगी लक्झरी बस ट्रकवर आदळल्याने २५ प्रवासी जखमी झाले. यापैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. ही दुर्घटना सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान मेहकरजवळील पिंपरी माळी-शहापूर गावाजवळ घडली.

प्राप्त माहितीनुसार, बाबा ट्रॅव्हल्सची खासगी प्रवासी बस पुण्याहून नागपूरकडे प्रवाशांना घेऊन जात होती. पहाटे ४ वाजेच्या सुमारास बस पिंपरी माळी गावाच्या शिवार परिसरात आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे भरधाव बसने समोरून जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

किंकाळ्या, आक्रोश अन् वेदना…

अपघातानंतर बसमध्ये किंचाळ्या व आक्रोश सुरू झाला. धडकेमुळे बसचा पुढील भाग दबला गेल्याने काही प्रवासी सुमारे एक ते दीड तास बसमध्येच अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, मेहकर पोलीस तसेच समृद्धी महामार्गावरील बचाव पथक रुग्णवाहिकांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कटरच्या साहाय्याने आणि इतर प्रयत्नांद्वारे बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका केली.

सर्व जखमींना तातडीने मेहकर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.