अकोला : समृद्धी महामार्गावरील असुविधा व दर्जाहीन कामांच्या मुद्द्यावरून बैठकीत पोलिसांसमोरच कंत्राटदाराला शिवीगाळ देऊन चोप दिल्याची धक्कादायक घटना वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे घडली. संतप्त मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराला मारहाण केली. यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या राड्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती.

अपघात व असुविधांमुळे कायम चर्चेत

मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासांत पार करण्याचे उद्दिष्टे ठेऊन समृद्धी महामार्ग तयार झाला. दहा जिल्ह्यांमधील ३९० गावांना हा महामार्ग जोडतो. अत्याधुनिक पद्धतीने समृद्धी द्रुतगती महामार्ग तयार केल्या गेला आहे. नियमित घडणाऱ्या अपघातांसह असुविधांमुळे हा महामार्ग कायम चर्चेत असतो. याच मुद्द्यावरून कारंजा येथे उद्रेक बघायला मिळाला.

मनसे पदाधिकारी आक्रमक, कंत्राटदारावर हल्ला

प्रवाशांच्या असुविधांकडे होणारे दुर्लक्ष व अपघाताच्यावेळी आपत्कालीन सुविधेतील दिरंगाई आदी मुद्द्यांवरून कारंजा लाड येथे मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी थेट कंत्राटदाराला चोप दिला. समृद्धी महामार्गावरील कामाची गुणवत्ता आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सुख-सोयींबाबत स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींकडे कंत्राटदार आणि प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. याच संतापातून बैठकीतच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कारंजा लाड परिसरात कंत्राटदाराला गाठले. बैठकीतील चर्चेदरम्यान पोलिसांच्या उपस्थितीतच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला मारहाण केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

‘…तर मनसे स्टाईलने जाब विचारला जाईल’

नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या समोरच कंत्राटदाराला मारहाण झाल्याने समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला. ‘लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या निकृष्ट कामाची तक्रार करूनही दखल घेतली जात नसेल, तर मनसे स्टाईलने जाब विचारला जाईल,’ असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या आंदोलनात राजू पाटील यांच्यासह अमोल लुलेकर (जिल्हाध्यक्ष, वाहतूक सेना), गजानन वैरागडे (जिल्हा सचिव), कपिल महाजन (शहराध्यक्ष, कारंजा), उमेश टोलमारे (उपजिल्हाध्यक्ष, वाशीम) आतिश डहाळे (उपजिल्हाध्यक्ष, मालेगाव-रिसोड) आदी पदाधिकारी सहभागी होते.