नागपूर : राज्यातील दळणवळण पायाभूत सुविधांना चालना देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार गडचिरोलीपर्यंत करण्याच्या हालचालींमुळे विदर्भातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पामुळे नागपूर ते गडचिरोली दरम्यानचा प्रवासाचा कालावधी कमी होऊन तो अवघ्या सव्वा तासांवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे विदर्भातील दुर्गम भाग मुख्य प्रवाहाशी अधिक वेगाने जोडला जाणार आहे.

सध्या नागपूर ते गडचिरोली हे अंतर रस्तेमार्गे सुमारे १६५ किलोमीटर आहे. या प्रवासासाठी सुमारे चार तासांचा कालावधी लागतो. जंगल क्षेत्र, अरुंद रस्ते, अवजड वाहनांची वर्दळ तसेच काही ठिकाणी रस्त्यांची खराब अवस्था यामुळे प्रवास वेळखाऊ आणि त्रासदायक ठरतो. पावसाळ्यात हा प्रवास आणखी कठीण होतो. मात्र समृद्धी महामार्गाचा विस्तार नागपूरहून भंडारा मार्गे गडचिरोलीपर्यंत झाल्यास भंडारा ते गडचिरोली हे अंतर सुमारे २३ किलोमीटरने कमी होणार आहे.

या प्रस्तावित मार्गामुळे नागपूर ते भंडारा आणि पुढे गडचिरोली असा सलग, रुंद आणि वेगवान दळणवळण मार्ग उपलब्ध होईल. एक्स्प्रेस-वेवर नियंत्रित प्रवेश, आधुनिक सुविधा आणि जास्त वेगमर्यादा असल्याने प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे. परिणामी नागपूर ते गडचिरोली हे अंतर अवघ्या सव्वा तासांत पार करणे शक्य होणार असून, दैनंदिन प्रवास, मालवाहतूक तसेच आपत्कालीन सेवांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.

समृद्धी महामार्गामुळे आधीच नागपूर आणि मुंबई ही दोन प्रमुख शहरे अधिक जवळ आली आहेत. सध्या या महामार्गावरून नागपूर ते मुंबई हे अंतर सहा ते आठ तासांत पार करता येते. या महामार्गामुळे उद्योग, शेतीमाल वाहतूक, लॉजिस्टिक्स, निर्यात तसेच पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. अनेक औद्योगिक वसाहती आणि वेअरहाऊसिंग प्रकल्प या मार्गालगत उभे राहत आहेत.

याच धर्तीवर समृद्धी महामार्गाचा गडचिरोलीपर्यंत विस्तार झाल्यास मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गडचिरोली जिल्हा खनिज संपत्ती, वनउपज, लोहखनिज तसेच औद्योगिक गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. जलद आणि सुरक्षित रस्ते संपर्क उपलब्ध झाल्यास उद्योगांची गुंतवणूक वाढण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे समृद्धी महामार्गाचा गडचिरोलीपर्यंत होणारा विस्तारामुळे पर्यटनाला देखील चालना मिळू शकणार आहे. आदिवासी बहुल या भागाला त्याचा लाभ मिळू शकेल.