अमरावती: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने काल आक्रमक पवित्रा घेतला. वाशिममधील शेलू बाजार परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी भव्य रास्तारोको आंदोलन केले. यावेळी महामार्गावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी एका कार्यकर्त्याला पोलिसांनी फरफटत नेले आणि एखाद्या गोणीप्रमाणे वाहनात कोंबले, तरीही त्वेषाने या कार्यकर्त्याने सरकारला इशारा दिला. ही चित्रफित सध्या समाज माध्यमांवर प्रचंड गाजत आहे.

नेमके काय घडले?

आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. यावेळी शिवसेना कार्यकर्ते अर्जून सुर्वे यांचे दोन्ही पाय पकडून पोलिसांनी उचलून आणल्याचे चित्रफितीत दिसत आहे. पोलिसांनी अक्षरश: सुर्वे यांना पोलीस वाहनात कोंबले. यावेळी सुर्वे यांनी सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, “या हिटलरच्या औलादी आहेत, शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचे काम या महाराष्ट्रात चालणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांचा इशारा आहे, शेतकऱ्यांसाठी आमच्या अंगावर कितीही केसेस टाकल्या तरीही चालेल, पण, हिटलरची हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचे काम करीत आहे”.

आम्ही अतिरेकी नाही, शेतकरी आहोत

यावेळी पोलिसांनी इतर कार्यकर्त्यांनाही वाहनात कोंबले, त्यावेळी एक कार्यकर्ता “आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत, आम्ही अतिरेकी नाही. एवढा फौजफाटा घेऊन आम्हाला मारायला आले आहेत का,” असा प्रश्न विचारताना चित्रफितीत दिसत आहे. ही चित्रफित सध्या समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

कोण आहेत अर्जुन सुर्वे?

दिवंगत भीमराव सुर्वे हे वाशिम जिल्ह्यातील कट्टर शिवसेना कार्यकर्ते होते. तीन वेळा ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. अर्जून सुर्वे हे त्यांचे पूत्र आहेत. सुर्वे यांनी यापुर्वीही अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला आहे. अर्जुन यांना वडिलांकडून संघर्षाचा फार मोठा वारसा मिळाला आहे. अर्जुन मातीवर घट्ट पाय रोवून आपल्या भूमिका स्पष्ट मांडत असतात. स्वतः अनेक आंदोलनांचा भाग असतात. समृद्धी महामार्गाच्या आंदोलनात अर्जुन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गेली अनेक दिवस ते या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी झटत होते, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.