नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे विशिष्ट कालावधीत निश्चित वेळीदारम्यान येथील वाहतूक बंद राहील.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) हे काम ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १४ टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. या कामादरम्यान संबंधित भागातील वाहतूक काही काळासाठी पूर्णतः थांबविण्यात येणार असल्याने प्रवाशांनी पर्यायी नियोजन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुका तसेच वर्धा जिल्ह्यातील सेलू, आर्वी आणि वर्धा तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कि.मी. शुन्य ते कि.मी. ८९+४१३ कि. मी. या दरम्यानच्या पट्ट्यात ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे महामार्गावरील वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा भाग म्हणून या गॅन्ट्री बसविण्यात येत आहेत.

एमएसआरडीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, गॅन्ट्री उभारणीचे काम अत्यंत तांत्रिक स्वरूपाचे असल्याने प्रत्येक टप्प्यातील कामाच्या ठिकाणी संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांच्या कालावधीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून काम पूर्ण होताच त्या टप्प्यातील वाहतूक तात्काळ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, या कालावधीत समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनी प्रवासापूर्वी वाहतूकविषयक सूचनांची माहिती घ्यावी, वेळेचे योग्य नियोजन करावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांसाठी आवश्यक ते समन्वय ठेवण्यात येणार असल्याचेही एमएसआरडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.