नागपूर: वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी आणि कमी वेळात अधिक अंतर गाठता यावे यासाठी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. मात्र, कधी अपघात तर कधी येथील समस्यांमुळेच हा महामार्ग अधिक चर्चेत असतो. समृद्धी महामार्गावर आवश्यक सुविधाही नसल्याने नागरिकांची ओरड असते. अनेक रस्त्यावर कठडे लावून ठेवले जातात. तर थोड्या चुकांसाठीही प्रवाशांची अडवणूक केली जाते. त्यामुळे नागरिक आणि वाहतूक पोलिसांमध्ये अनेकदा वाद होतो. असाच काहीसा वादाचा प्रकार रविवारी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर घडला. यामुळे ट्रक चालकाने चक्क त्याचा मोठा ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा केला. यामुळे अनेक काळ वाहतूक कोंडी झाली होती.
नेमका काय प्रकार घडला
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर आरटीओच्या कारवाईनंतर संतप्त झालेल्या ट्रकचालकाने चक्क ट्रक महामार्गावर आडवा केल्याची घटना अमरावतीजवळ घडली. ट्रक मार्गिकेत आडवा उभा राहिल्याने समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार, आरटीओच्या पथकाकडून संबंधित ट्रकवर कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर चालकाने संतापाच्या भरात ट्रक महामार्गावर आडवा उभा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहनांची ये-जा काही काळ ठप्प झाली.
महामार्गावर वाहनांच्या रांगा
ट्रक आडवा झाल्याने समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला. ट्रकच्या दोन्ही बाजूंनी वाहनांची गर्दी वाढत गेली. काही वेळातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. समृद्धी महामार्गावर आधीच वेगाने वाहतूक सुरू असते. अशा परिस्थितीत जड वाहन महामार्गावर आडवे उभे राहिल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला. अनेक वाहनचालकांना बराच वेळ कोंडीत अडकून पडावे लागले.
— Devesh Gondane (@GondaneDevesh) August 9, 2026
पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आडवा उभा असलेला ट्रक हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले. या घटनेमागे आरटीओच्या कारवाईचा संदर्भ असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. मात्र, ट्रकवर नेमकी कोणत्या कारणामुळे कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर चालकाने ट्रक महामार्गावर आडवा का केला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, समृद्धी महामार्गासारख्या महत्त्वाच्या द्रुतगती मार्गावर वाहन आडवे उभे करून वाहतूक रोखल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला. या घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.
