अकोला : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन पुकारण्यात आले आहे. वाशीम जिल्ह्यातील वनोजा येथे समृद्ध महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी शुक्रवारी शेतकरी व शिवसैनिकांसह हजारोंचा जनसमुदाय उसळला. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली. आ. नितीन देशमुख यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा महामार्गावर तैनात आहे.
नेमकं घडलं काय?
शेतकऱ्यांना केवळ ५ हजार रुपयांची तात्पुरती मदत न देता, अतिवृष्टी व पीक नुकसानाची संपूर्ण भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाने आंदोलनाचे हत्यार उपसले. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्गच शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी रोखण्यात येत असल्याचे आ. नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आ.देशमुख यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला, वाशीम जिल्ह्यात दौरे करून शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
आंदोलनात मोठा जनसुमदाय उसळला
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज सकाळपासून वनोजा येथे शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने दाखल झाले. आंदोलनासाठी मोठा जनसमुदाय जमला. आंदोलन रोखण्यासह कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. विभागाच्या सर्व जिल्ह्यातील दीड हजारावर पोलीस अधिकारी व कर्मचारी आंदोलन स्थळी तळ ठोकून आहेत.
आंदोलकांसोबत झटापट, पोलिसांनी घेतले ताब्यात
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीसाठी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. मोठा पोलीस बंदोबस्त असतांनाही आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखून धरला. समृद्धी महामार्गावरील आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आंदोलकांनी शासनावर तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी आमदार नितीन देशमुख यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी परवानगी का नाकारली?
पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली होती. त्यानंतरही ठाकरे गटाने आंदोलन केले. समृद्धी महामार्ग हा महत्त्वाचा द्रुतगती मार्ग असल्याने येथे रास्ता रोको केल्यास वाहतुकीत अडथळे निर्माण होण्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारून आंदोलकांना नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतरही शिवसेनेने आंदोलन केले.
