नागपूर : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग त्याच्या निर्मितीपासूनच चर्चेत आहे. या रस्त्यासाठी जागा देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला.आंदोलन केले. मार्ग निश्चित होण्यापूर्वीच काहींनी शेतकऱ्यांकडून कमी किमतीत जागा खरेदी करून सरकारकडून जादा किंमत वसूल केल्याची चर्चा झाली. या रस्त्यांवरील अपघातही चर्चेचा विषय बनला. त्यामुळे रस्ताच योग्यरीत्या तयार करण्यात आला नसल्याची चर्चा झाली. अलीकडच्य काळात वाहनांवर हल्ला करून इंधन चोरीच्या घटनाही होत असल्याचे समोर आले.
टीका झाल्यामुळे अपघात टाळण्यासाठी शासनाकडून विविध उपाय करण्यात येत आहे. महामार्गावर गस्त सुरू करण्यात आली आहे. दरोडेखोरी, लुटमार रोखण्यासाठी रस्त्यावर पाळत ठेवण्यााठी सीसीटीव्ही लावण्यात आले असून ड्रोनचा देखील वापर करण्यात येणार आहे.
‘पीटीडोड कॅमेरे’ व्दारे पाळत
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धी महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम’ (आयटीएस) यंत्रणा उभारण्यात येत आहे. या माध्यमातून ‘पीटीडोड कॅमेरे’ आणि आपत्तकालीन बॉक्स प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर बसवण्यात येत आहेत. प्रत्येक १०० कि.मी. अंतरावर वाहतूक व्यवस्थापन केंद्रे तयार करण्यात येत आहेत. या केंद्रांमध्ये नियुक्त कर्मचारी २४ तास महामार्गाचे निरीक्षण करतील. त्यासोबतच प्रत्येक वाहतूक व्यवस्थापन केंद्रावर ‘सीसीटीव्ही’सह ‘ड्रोन’ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.
मनोज कायंदे यांनी विधानसभेत, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर इंधन चोरी व गुन्हेगारीच्या घटनांबाबतचा मुद्दा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या प्रश्नावरील लेखी उत्तरात वरील माहिती नमूद आहे.
नाशिक जिल्ह्यातील घटना
नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावर ५ जानेवारी २०२६ रोजी डिझेल चोरी करणाऱ्या टोळीने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली होती. यापूर्वी समृद्धी महामार्गावर रात्रीचे वेळी डिझेल चोरीच्या घटना छत्रपती संभाजीनगर आणि जालना हद्दीत घडलेल्या. इंधन चोरी व इतर प्रकारचे गुन्हे घडू नयेत म्हणून महामार्ग पोलिसांकडून पथके नेमून नियमितपणे गस्त करण्यात येते. समृद्धीवर महामार्ग पोलीस विभागाकडून नियमितपणे पेट्रोलिंग वाहने कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून यासाठी १५ वाहने पुरवण्यात आलेली आहेत. ठाणे परिक्षेत्रात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना इंटरचेंज या ठिकाणी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्यात आले असल्याचे लेखी उत्तरात नमूद आहे.
