अमरावती: समृद्धी महामार्गावर आरटीओ अधिकाऱ्यांशी झालेल्या वादानंतर एका ट्रकचालकाने कंटेनर ट्रक रस्त्यावर आडवा लावून वाहतूक ठप्प केल्याची घटना रविवारी घडली होती. या घटनेची चर्चा राज्यभरात झाली. या प्रकरणात आता संबंधित ट्रकचालकाच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
नेमके काय घडले?
वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर ९ ऑगस्ट रोजी कंटेनर वाहन क्रमांक एचआर ५५/ बीए ८५४४ च्या चालकाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे निदर्शनास आले होते. या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये नागपूर येथून पुणे येथे जाणारा माल लोड असल्याचे निदर्शनास आले. वाहन राष्ट्रीय महामार्गाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्याने संबंधित वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वाहन चालकावर वर्धा जिल्ह्यातील सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धोकादायक पद्धतीने वाहने उभी करू नयेत
समृद्धी महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध परिवहन विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाच्या नोडल अधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी याबाबत वाहनधारक व वाहनचालकांना विशेष सूचना दिल्या आहेत. समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात असल्याने महामार्गावर वाहन बंद पडल्यास अथवा कोणत्याही कारणास्तव वाहन थांबवावे लागल्यास ते सुरक्षित ठिकाणी हलविणे अत्यंत आवश्यक आहे. महामार्गाच्या मुख्य मार्गावर किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी वाहन उभे करणे धोकादायक असून, त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे, असे प्रादेशिक परिवहन विभागाने म्हटले आहे.
वाहन सुरक्षित ठिकाणी हलवावे
सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षेच्या संदर्भात अंतरिम निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांचे पालन करीत सार्वजनिक रस्ते व महामार्गांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने पार्क करू नयेत, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. वाहन बिघाड झाल्यास चालकांनी तत्काळ वाहन सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी. समृद्धी महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर भविष्यातही कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा समृद्धी महामार्ग नोडल अधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिला आहे.
