बुलढाणा : लोकार्पण झाल्यापासून लहान मोठे अपघातामुळे गाजत असलेला हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अलीकडे चोऱ्या, दरोडे यांनीही गाजत आहे. आत या मार्गावरील सुरक्षा साहित्य चोरी करण्यापर्यंत चोरट्याची मजल गेली आहे.
समृद्धी महामार्गावर जनावरांच्या प्रवेशामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी बसविण्यात आलेले लोखंडी अँगल व सुरक्षा जाळी चोरी करण्यात आल्याचे उघडकीस आले. हे साहित्य जालना शहरातील नागेवाडी टोल नाक्याजवळ विक्रीस नेत असताना चंदनझिरा पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना पकडले. या कारवाईत चोरीचा मुद्देमाल व वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण ५ लाख ५३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार दुकानाच्या मालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
अटक केलेले चोरटे हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीडचे रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. केशव शिवणी येथील वाहन चालक फरार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री चंदनझिरा पोलीस ठाण्याचे गस्ती पथक नागेवाडी टोल नाका परिसरात ‘पेट्रोलिंग’ करत होते . त्यावेळी एक पिकअप वाहन पोलिसांना पाहून छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने पळताना दिसले. संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग केला असता चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. वाहनातील तिघे जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोलिसांनी इकरार खान मुक्तार खान व विलास भाऊलाल चुंडियाल (राहणार दुसरबीड, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा) यांना पकडले. मात्र वाहनमालक व चालक देवानंद शंकर डोईफोडे (रा. केशव शिवणी, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला.
पिकअप वाहनाची तपासणी केली असता सुमारे एक टन वजनाचे लोखंडी अँगल व जाळी तसेच लोखंड कापण्यासाठी वापरले जाणारे तीन कटर आढळून आले. याप्रकरणी हवालदार कृष्णा तंगे यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत आरोपींनी सिंदखेड राजा ते किंगाव राजा दरम्यान समृद्धी महामार्गावरून हा माल चोरी केल्याची कबुली दिली. यापूर्वीही अशाच प्रकारे चोरी करून माल विक्री केल्याचे त्यांनी सांगितले. फरार आरोपीचा शोध सुरू असून तपास पोलीस उप निरीक्षक मारियो स्कॉट करीत आहेत.
