नागपूर : झारखंड येथून ट्रक चालक बनून नागपुरात आलेला मोहम्मद ईमान- उल उर्फ कल्लू तजमुल खान १० वर्षांमध्ये वाळू तस्कर टोळीचा सूत्रधान बनला. यातून कमावलेल्या बेहिशेबी रकमेतून कल्लूने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या रांचीमधील बंगल्यासमोर सहा हजार चौरस फुटाचा भूखंड खरेदी केल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली आहे.
टोळी प्रमुख कल्लू खानसह ९ जणांवर मकोका लावताच, समोर येत असलेल्या माहितीतून धक्कादायक बाबी ग्रामीण पोलिसांच्या हाती लागत आहेत. कल्लूचा खरबीत आलिशान बंगला असून आणखी एका भूखंडावर तो वाळू साठवून ठेवतो, असे दस्तावेजातून चव्हाट्यावर येत आहे. कल्लूच्या एकंदर मालमत्तेचा हिशेब लावण्यासाठी ग्रामीण पोलीस त्याच्या नावावर असलेल्या बँक खात्यांमधील रकमेचीही चौकशी करत आहे. त्याने जीएसटी चोरल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून चोहोबाजूने कल्लू खानच्या मुसक्या आवळल्या जात आहेत.
टोळी प्रमुख कल्लू खान हा मूळचा झारखंड राज्यातील रांचीचा रहिवासी. साधारण २०१६ मध्ये कल्लू खान ट्रकचालक बनून नागपुरात आला. तो खरबी मार्गावरील ‘नॅशनल ढाबा’ शेजारी एआर ट्रान्सपोर्टचा मालक झाकीर भाईकडे काम करायचा. नंतर तो वाळू तस्करीचे ट्रक चालवू लागला. कालांतराने स्वत: तस्करीत शिरला. १० वर्षांत त्याने वाळू तस्करीसाठी डझनभर टिप्पर खरेदी केले. पवनीतील पंचभाई आणि हटवार टोळीशी संगनमत करून कल्लूने वाळू तस्करीचे जाळे विस्तारले. तस्करांची स्वतंत्र यंत्रणा तयार करणाऱ्या कल्लूच्या नावावर आज अनेक ट्रक, ३ आलिशान कार दोन बंगले आहेत.
महसूल अधिकाऱ्यांवर केला होता हल्ला
एप्रिल महिन्यात महसूल पथक खरबी मार्गावरून जात असताना त्यांना दोन ट्रकमध्ये वाळू दिसली होती. पथकाने रॉयल्टी मागताच ट्रक चालकांनी कल्लू खानशी संपर्क साधला. त्यावेळी कल्लू खान एमएच-४१, एए-८१०० क्रमांकाच्या मर्सिडिज बेंझने तेथे गेला. त्याने महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला केला. याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. हा हल्ला कल्लूनेच केल्याचे पोलिसांच्या तपासातूनही स्पष्ट झाले. त्याच्या कल्लूच्या मुसक्या आवळल्या असत्या तर कोट्यवधींचा महसूल सरकारला मिळाला असता.
काय सांगू मामा नावाने व्हॉट्सअपवर गट
आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन कल्लूने व्हॉट्सअपवर ‘काय सांगू मामा ‘ नावाचा गट तयार केला. पूर्व विदर्भातील वैनगंगेचे पात्र असलेल्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वडसा पासून ते आंध्र प्रदेश सिमेलगतच्या वाळू घाटावरील छोटे- मोठे ७५० तस्कर या गटाचे सदस्य आहेत. यावरून बनावट रॉयल्टी कागदपत्रांची आदानप्रदान होत होती. पूर्व विदर्भातील रेती घाटाजवळ कुठे कुठे नाकाबंदी सुरू आहे, याचीही माहिती गटातून जात होती. त्यामुळे नाकाबंदीला टाळून आतल्या मार्गाने वाळू तस्करी सुरू होती. मकोका लावून टोळीच्या मुसक्या आवळताच ग्रामीण पोलिसांनी व्हॉट्सअप गटावरचे हे सगळे संदेश हस्तगत केले आहेत.
कल्लू टोळीवर डझनभर गुन्हे
वैनगंगा नदीच्या पवनी घाटावरून कल्लू वाळू तस्करी करतो. तेथून वाळू तो नागपुरात आणतो. वाळू तस्करीच्या वादातून त्याच्यावर भिवापूरात ३, पवनीत २, उमरेड, नंदनवन, कुहीत डझनभर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याने पवनीतही महसूल अधिकाऱ्यांवर बंदूक उगारली होती. पण त्याचे पुढे काय झाले यावर पोलीस अधिकारी चकार शब्द काढत नाहीत.
कल्लू खान टोळीने महसूल चोरून कमावलेल्या संपत्तीची माहिती घेतली जात आहे. त्याच्या बँकेतल्या व्यवहारांचीही माहिती घेणे सुरू आहे. टोळीने जीएसटी चोरल्याचे प्राथमिक पुरावे समोर आले आहेत. लवकरच कर विभागाच्या पथकालाही कक्षेत आणले जाईल. कल्लूच्या संपत्तीचे विवरण रांची येथील नोंदणी विभागाकडे मागवण्यात आले आहे. गरज पडली तर या संपत्तीवर टाच आणली जाईल.-अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपूर ग्रामीण
