नागपूर :  जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव न होणे हे राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पथ्यावर पडले आहे. मंत्री, आमदारांच्या आशीर्वादाने सावनेर, कामठी आणि मौदा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात वाळू चोरी होत आहे. या बेकायदेशीर व्यवसायामुळे कन्हान नदीच्या आसपासच्या गावात वाळू चोरटय़ांची ‘दादागिरी’ही वाढली आहे.  जिल्ह्यात कन्हान आणि पेंच नदीवर अधिकृत २२ घाट आहेत. मागील दीड ते दोन वर्षांपासून त्यांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे शासनाला महसूल मिळाला नाही. शिवाय, जिल्ह्यात बरेच अनधिकृत घाट असून त्यातून वाळूचा उपसा होत आहे. घाटांचा लिलाव न होण्याचा लाभ राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते पुरेपूर घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री तसेच त्या भागातील आमदारांच्या वरदहस्तामुळे वाळूचे अवैध उत्खनन वाढले आहे.  ‘लोकसत्ता’ने वाळू चोरीबाबत सत्य जाणून घेण्यासाठी सावनेर, कामठी आणि मौदा तालुक्यातील काही घाटांना भेटी दिल्या. भेटीदरम्यान या अवैध व्यवसायातील साखळी उघड झाली. अवैध वाळू उत्खननात राजकीय नेते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहभागी असल्याचे आणि त्यांच्या दबावात महसूल अधिकारी तसेच सर्व काही उघडय़ा डोळय़ाने बघूनसुद्धा कोणाचे थेट नाव न सांगणारे गावकरी दिसून आले. सावनेर तालुक्यातील गोसेवाडी हे लहानसे गाव कन्हान नदीला लागून आहे. नागपूरहून बैतुल महामार्गाने वाकी येथून गोसेवाडीला जावे लागते. अगदी हजार ते दीड हजार लोकसंख्येच्या या गावातील अनेक घरात वाळू वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर आहेत. ट्रॅक्टरने   नदीतून वाळू आणली जाते. त्यानंतर मोठय़ा ट्रकने गावाबाहेर पाठवली जाते. यासंदर्भात गावातील नागरिकांना विचारले असता, त्यांनी वाळू चोरीचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढल्याचे सांगितले. गावातील अनेक युवक अवैध वाळू उत्खनन व्यवसायात सक्रिय आहेत. वाळू खरेदी करणारे लोक मंत्री आणि आमदारांचे कार्यकर्ते आहेत. ही एक साखळी आहे, असेही गावकऱ्यांनी सांगितले. परंतु कोणाचेही नाव घेण्यास ते तयार नव्हते. आम्हाला गावात राहावे लागते. कशाला वैर घ्यायचे, असा पवित्रा त्यांनी घेतला. गावातील तरुण मुले अधिकाधिक आणि लवकरात लवकर पैसा कमावण्यासाठी वाळू चोरीच्या व्यवसायात शिरली असून त्यांची गावात गुंडगिरी वाढली आहे. त्यातून गावातील सलोख्याचे वातावरणही गढूळ झाले आहे. 

मध्यप्रदेशातून वाळू आणण्यासाठी नदीपात्रात रस्ता

जिल्हाधिकारी कार्यालयाने वाळू चोरी प्रकरणात एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात एक पथक पाठवून सावनेर तालुक्यातील सायवाडी घाटावर काही ट्रक ताब्यात घेतले होते. तसेच वाळू चोरीसाठी सायवाडी नदीपात्रात मधोमध बनवलेला ३०० मीटरचा रस्ताही उद्ध्वस्त केला होता. या रस्त्याने मध्यप्रदेशातून वाळू तस्करी केली जात होती. या कारवाईनंतरही वाळू चोरी आणि अवैध वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये झालेल्या कारवाईत वाळू तस्करी करणारे ट्रक (एम.एच. ३१ एस.सी. ४८५०, एम.एच. ४० सीडी ७५५०, एम.एच. ४०- ६००१) पडकले होते. याशिवाय, एम.एच. ३१ एफसी ४००० क्रमांकाचा ट्रक जप्त केल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. हे ट्रक कोणाचे आहेत आणि त्यांचे ‘गॉडफॉदर’ कोण आहेत, याचा शोध पोलीस का घेत नाही, असा सवाल गावकऱ्यांनी केला.

वाळूचे अवैध उत्खनन आणि अवैध वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास वाळू चोरटय़ांविरोधात पुन्हा कारवाई केली जाईल.

– विमला आर., जिल्हाधिकारी, नागपूर.