यवतमाळ : मागील वर्षी आपण महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढणार होतो. मात्र, पक्षाने माघार घेण्याबाबत सांगितल्याने मी आघाडीचा धर्म पाळला. त्यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराने यवतमाळ भयमुक्त, गुंडगिरीमुक्त, खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनावरच लोकांनी त्यांना निवडून दिले. मात्र, सध्या हे आमदार पंचायत समिती सदस्य असल्यासारखे वागत असल्याची टीका माजी आमदार संदीप बाजोरीया यांनी केली.
ते आज बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आपण आघाडी धर्म पाळला, मात्र निवडून आलेल्या आमदारांनी जनतेला दिलेले आश्वासन पाळले नसल्याची टीका बाजोरीया यांनी यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्यावर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यामुळे आपण राजकारणात आलो.
पक्षात फूट पडल्यानंतर त्यांची सोबत सोडून शरद पवार यांच्यासोबतच राहिलो. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षाचाही आपण चार महिन्यसांपूर्वीच राजीनामा दिला असून सध्या कुठल्याच पक्षात नाही. परंतु, आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासून करत असल्याचे बाजोरीया यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत घुईखेडकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यावर ताशेरे ओढले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना कोट्यवधींचा भ्रष्टाचार देशमुख यांनी केल्याचा आरोपही बाजोरीया यांनी यावेळी केला. संस्थाचालक म्हणून मिरवणारे घुईखेडकर, देशमुख यांनी केवळ पैसा लुबाडण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला. आपण करत असलेले आरोप खोटे असेल तर आपल्यावर मानहाणीचा दावा टाकावा, असे आव्हानही बाजोरीया यांनी यावेळी दिले.
जिल्हा मध्यवर्ती बँक बुडीत असतानाही बँकेत पदभरती होत असल्याबाबत बाजोरीया यांनी टीका केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विद्यमान संचालकांनी पदभरतीचा घाट पैसे कमविण्यासाठी घातला आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या या बँकेची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तरीसुद्धा पदभरती घेऊन संचालक स्वतःचा स्वार्थ बघत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या पदभरतीस मंगळवारीच न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी, या पदभरतीची केंद्रीय सहकार मंत्री अमीत शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करणार असून, संचालकांच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांची बँक लुटू देणार नसल्याचे संदीप बाजोरीया म्हणाले. आगामी नगरपालिका निवडणुकीत नागरिकांनी स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीस नगराध्यक्षपदी बसवावे, असे आवाहनही बाजोरीया यांनी यावेळी केले.
