BJP Politics: नागपुरातील भाजपचे निर्विवाद नेतृत्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे आहे. फडणवीससुद्धा त्यांचेच बोट धरून राजकारणात आले. ते मुख्यमंत्री होईपर्यंत हे शहर तसेच जिल्ह्यात गडकरींचा शब्द अंतिम मानला जायचा. येथील सर्व आमदार व इतर लोकप्रतिनिधी गडकरींचे समर्थक अशीच ओळख होती. फडणवीसांकडे राज्याचे नेतृत्व आल्यावर त्यांनी स्वत:च्या समर्थकांना बळ देणे सुरू केले. जोशी हे त्यातून समोर आलेले नेते. याच काळात त्यांना महापौरपद मिळाले. नंतर गडकरींचे कट्टर समर्थक अनिल सोले यांना उमेदवारी नाकारून जोशींना पदवीधर मतदारसंघात संधी देण्यात आली. ती त्यांनी हातची घालवली. हा पराभव फडणवीसांच्या जिव्हारी लागणारा होता. नंतर जोशींना येथील मुख्यमंत्री कार्यालयात मानद सचिव हे पद नव्याने निर्माण करून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न झाला. या माध्यमातून ते नागपुरात फडणवीसांचे विश्वासू म्हणून वावरत राहिले.
फडणवीसांकडे कोणतेही काम असेल तर जोशींना भेटावे लागते असा अलिखित पायंडाच या काळात पडून गेला. राज्य सरकारच्या माध्यमातून या शहरात होणाऱ्या विविध विकासकामांवर जोशींचीच ‘देखरेख’ असते. दोन वर्षापूर्वी त्यांना विधान परिषदेतील एका रिक्त जागेवर संधी देण्यात आली. ती देतानाच नव्याने आमदारकी मिळणार नाही असेही स्पष्टपणे सांगितले गेल्याचे कळते. आता ही मुदत संपायला पाच महिन्यांचा काळ शिल्लक असताना जोशींनी ‘निवृत्तीचे अस्त्र’ उगारून अनेकांना कोड्यात टाकले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत वर्तुळातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या यादीत जोशींचा समावेश आहे.
सोबतच मोहित कंबोज व अमोल काळे यांचीही नावे या यादीत असल्याचे सर्वांना ठाऊक होते. त्यातील काळेंचे अचानक निधन झाले व आता उर्वरित दोघांनी थेट राजकीय संन्यास घेतल्याने यामागे नेमके व खरे कारण काय? जोशींनी जाहीर केलेल्या पत्रात निष्ठावंतांना डावलले जाते, बाहेरून येणाऱ्यांना पदे दिली जातात असा राग आळवला असला तरी त्यावर विश्वास ठेवायला कुणी तयार नाही. त्यांनी पालिका निवडणुकीत काही नावांसाठी आग्रह धरला होता. त्यात त्यांचे सहाय्यक दोंतुलवारांचा समावेश होता. या नावाला संघाकडून विरोध झाल्याने ते मागे पडले. त्यांचे आणखी एक समर्थक निशितकर यांनाही उमेदवारी मिळाली नाही. गेली अनेक वर्षे स्थानिक राजकारणात सक्रिय असलेल्या जोशींना या घडामोडी काही नवीन नाहीत. प्रत्येक निवडणुकीत असे डावलण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे या क्षुल्लक कारणावरून त्यांनी राजत्याग केला यावर विश्वास ठेवायला कुणी तयार नाही. आमदारकीची मुदत संपल्यावर पुन्हा ती मिळावी यासाठी दबावतंत्राचा भाग म्हणून त्यांनी हे नाट्य रचले अशीही चर्चा पक्षवर्तुळात आहे. मात्र फडणवीसांच्या इतके जवळ असताना या नाट्याची त्यांना गरज काय हाही प्रश्न चर्चेत आहे.
जोशी अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असले तरी पश्चिम व दक्षिण-पश्चिम वगळता इतरत्र त्यांचा प्रभाव नाही. समर्थकांची खूप मोठी फळी त्यांना उभी करता आली नाही. या घोषणेनंतर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर काही मोजक्याच कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. यातून या नाट्याला प्रसिद्धी मिळाली पण पक्षावर दबाव निर्माण झाला नाही. फडणवीस ज्या वेगाने यश मिळवत आहेत त्याच वेगाने त्यांचे काही हितशत्रूही तयार होत आहेत. यांची संख्या पक्षाबाहेर कमी व पक्षातच जास्त आहे. यापैकी काहींनी दिल्लीत जाऊन तक्रारी केल्या व त्यातून जोशी ‘रडार’वर आले. म्हणून त्यांना हा निर्णय घ्यावा लागला किंवा घेण्यास सांगण्यात आले असाही तर्क यामागे लावला जात आहे. त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रात आता आमदारकी मिळाली तरी घेणार नाही. नव्यांना संधी द्या असे पक्षाला सांगेन असा स्पष्ट उल्लेख केला.
या नाट्याला सुरुवात झाल्यावर माध्यमांशी बोलताना मात्र त्यांनी यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. फडणवीस सांगतील तसे वागू, ते म्हणतील विहिरीत उडी मार तर मारू असे ते यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तरले. जोशी आता ५५ वर्षांचे आहेत. त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेले अनेक नेते पक्षात कार्यरत आहेत. वेगवेगळ्या पदावर आहेत. तरीही ते नव्यांना संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेतला असे म्हणत असतील तर ते कुणालाही पटणारे नाही.
पक्षातील निष्ठावंतांना डावलणे, बाहेरच्यांना संधी देणे यावर त्यांची भूमिका एक कार्यकर्ता म्हणून योग्य असली तरी पक्षाने हे ‘आयात’ करण्याचे धोरण सामूहिकपणे राबवले. यात फडणवीसांचाही सहभाग होता. मग पक्षपातळीवर त्यांनी या धोरणाला विरोध का दर्शवला नाही? त्यासाठी थेट माध्यमाकडे जाण्याची गरज का भासली? याची उत्तरे शोधायला गेले तर जोशींचा निर्णय याच मुद्यावरून घेतला होता हे कुणालाही पटणारे नाही. आता फडणवीस आल्यावर वा त्यांची भेट झाल्यावर ते निर्णयावरून मागे फिरतात की ठाम राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यांच्या या निर्णयामागचे खरे कारण अखेरपर्यंत गुलदस्त्यात राहण्याचीच शक्यता जास्त आहे.
