Premium

अमरावती : दिल्लीतून चोरलेल्या कारवर सांगलीच्‍या वाहनाचा क्रमांक, ई-चलान प्रणालीमुळे उलगडा

दिल्ली येथून चोरलेल्या कारवर अमरावती शहरातील दोन भामट्यांनी सांगली इथला वाहन क्रमांक टाकला. त्यानंतर त्या कारचा शहरात सर्रास वापर सुरू केला.

amravati, Sangli vehicle number, car stolen from Delhi, RTO, traffic police, e-challan system
अमरावती : दिल्लीतून चोरलेल्या कारवर सांगलीच्‍या वाहनाचा क्रमांक, ई-चलान प्रणालीमुळे उलगडा

अमरावती : ई चलान प्रणालीमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दंड करण्याबरोबरच वाहन चोरीचे गुन्हेही उघडकीस आणणे शक्य होत आहे. या प्रणालीत तांत्रिक व्‍यवस्‍थेमुळे अमरावती पोलिसांनी चोरीचे वाहने जप्त केले असून ते चोरणाऱ्या आणि वापरणाऱ्यांचीही ओळखही पटवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहन चोरल्यानंतर मालकासह पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी त्यावर बनावट नोंदणी क्रमांक (नंबरप्लेट) दिला जातो. अशा वाहनांनी वाहतुकीचे नियम मोडल्यास या बनावट नोंदणी क्रमांकाआधारे वाहतूक पोलिसांकडून चलान दिले जाते. वाहन चोरीला गेले असले तरी चलन मूळ मालकाला मिळते. असाच प्रकार अमरावतीत घडला आहे.

हेही वाचा… रावणपुत्र मेघनाथाची एक नाही तर दोन-दोन मंदिरे; लोक म्हणतात, “नवसाला पावणारा…”

दिल्ली येथून चोरलेल्या कारवर शहरातील दोन भामट्यांनी बनावट वाहन क्रमांक टाकला. त्यानंतर त्या कारचा शहरात सर्रास वापर सुरू केला. दरम्यान, त्या कारला शहर वाहतूक शाखेने तब्बल सहावेळा ई-चलानने दंड ठोठावला. या कारवाईतून दिल्लीवरून चोरलेल्या कारवर सांगलीच्‍या वाहनाचा क्रमांक असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

हेही वाचा… ईद मिलादुन्नबीनिमित्त बुलढाण्यात ‘जुलूस’! गणेश विसर्जनामुळे यंदाचा उत्सव मर्यादित; मुस्लीम बांधवांचे सामंजस्य

विजय लालचंद त्रिकोटी (३९) रा. रामपुरी कॅम्प व राहुल शेळके रा. अकोली रोड, साईनगर अशी आरोपींची नावे आहेत. चारचाकी वाहन क्रमांक एमएच १४ एफएक्स २९६२ हे सांगली सोडून कुठेही फिरले नसताना, कुठेही प्रवास केला नसताना त्या वाहनास वेग नियमनाच्या उल्लघंनाबाबत ई-चलान प्राप्त होतात, अशी तक्रार शहर वाहतूक शाखेत कार्यरत पोलीस हवालदार संतोष तिवारी प्राप्त झाली. या वाहनास एकूण सहा ई-चलानने दंड आकारण्यात आला. ते सर्व चलान वाहनाचे मूळ मालक के. डी. सन्नोळी (रा. सांगली) यांना गेले. आपले वाहन सांगली सोडून कुठेही गेले नसताना अमरावती शहर व ग्रामीण पोलिसांकडून ई-चलान कसे? असा प्रश्न त्यांना पडला. तर, दुसरीकडे सहा वेळा चलान दिल्याने ते वाहन जप्‍त करण्याचे आदेश वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस आयुक्तांनी दिलेत. त्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखेने मूळ मालक के. डी. सन्नोळी यांचा अर्ज, सोबतच्या दस्तऐवजाची तपासणीसुद्धा केली. तसेच प्रादेशिक परिवहन विभागासोबतसुद्धा संपर्क करण्यात आला. अमरावतीमध्ये ते वाहन कोण चालवितो, तेदेखील तपासण्यात आले. तपासाअंती विजय त्रिकोटी व त्याचा मित्र राहुल शेळके यांनी दिल्ली येथून एक चारचाकी वाहन चोरले. त्या कारचा मूळ क्रमांक डीएल ८ सीएएम ७५३४ हा होता. ती ओळख मिटविण्यासाठी त्या वाहनावर सन्नोळी यांच्या वाहनाचा क्रमांक टाकला. इंजिन व चेसिस क्रमांक देखील मिटविल्याचे स्पष्ट झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sangli vehicle number on car stolen from delhi deciphered by e challan system mma 73 asj

First published on: 28-09-2023 at 14:44 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा