नागपूर : शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) सहा फुटीर खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे सहा खासदार आता शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत खासदार बनले आहेत. या सहा खासदारांपैकी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी शिंदे सेनेत जाण्यामागील कारण स्पष्ट केले. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयावरही प्रतिक्रिया व्यक्त केली.
काय म्हणाले खासदार संजय देशमुख?
नागपुरात शिंदे गटात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर खासदार संजय देशमुख प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. ते म्हणाले, जनतेने ज्या विकासाच्या अपेक्षेने निवडून दिले. त्यांची अपेक्षा पूर्ण करू शकत नव्हतो. विकासाची कामे व्हावी, अशीच आम्हा सर्व सहा खासदारांची इच्छा होती. त्यामुळे शिंदे सेनेत प्रवेश केला. मतदार संघातील विकास कामे रखडलेले होती. रेल्वेचे प्रकल्पासह आणखी मोठे प्रकल्प थांबले होते. त्यामुळे आम्ही सहा जणांनी एकत्र येऊन निर्णय घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली. दोन दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. त्यांनी मतदार संघातील विकासाची कुठलीही कामे थांबणार नाही, अशी ग्वाही दिली, असे खासदार संजय देशमुख म्हणाले.
लोकसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय अपेक्षितच होता
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल, शनिवारी शिंदे सेनेत सहा खासदारांचे विलिनीकरण मंजूर केले, याबाबत विचारले असता ते म्हणाले, निकाल हा आमच्या बाजूनेच लागणार होता. कायद्याच्या चौकटीत राहूनच शिंदे सेनेत आम्ही पक्षप्रवेश केला आहे. आम्ही सहा खासदार एकत्र बसलो. कायद्याबाबत अभ्यास केला. लोकसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय आम्हाला अपेक्षितच होता.
विदर्भातील तीन नगराध्यक्ष लवकरच शिंदे सेनेत
विदर्भातील आमदार संपर्कात आहे काय, असे विचारले असता त्यांनी कुणीही आमदार संपर्कात नसल्याचे नमुद केले. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन यवतमाळ जिल्ह्यातील तीन नगराध्यक्ष आणि त्यांचे सहकारी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता विरोधी पक्ष राज्यात राहतील की नाही, अशी शंका आहे. येत्या सात आठ दिवसांत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश करणार आहे. मतदार संघात शिंदे यांना आमंत्रित केले आहे, त्यांचा दौरा निश्चित झाल्यानंतर पक्षप्रवेश सोहळा होईल, असे ते म्हणाले. शिंदे यांच्या नेतृत्त्वात काम करण्यासाठी तरुणांमध्ये लाट आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना जी कामे केली, ते सर्वसामान्य नागरिकांनी बघितले आहे. त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तरुण, शेतमजूर, महिलांच्या सुविधांना प्राधान्य देण्याचे काम केले. लाडक्या बहिणीसारखी योजना त्यांच्या पुढाकाराने आली, असे ते म्हणाले.
