बुलढाणा: बुलढाणा विधानसभा मतदारसंघांचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड, यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांबद्धल केलेले वादग्रस्त आणि असंवेदनशील विधान त्यांना भोवण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर शिवसेना पक्षांतर्गत कारवाईची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी आपल्या विधानाबद्धल यू टर्न घेत दिलगिरी व्यक्त केली असली तरी कारवाईची ही टांगती तलवार त्यांच्यावर कधीही कोसळू शकते अशी चिन्हे आहेत..

थेट कारवाईचे संकेत

शिवसेना शिंदेगटाचे आमदार संजय गायकवाडयांनी यापूर्वी वारंवार वादग्रस्त विधाने केली. मात्र पक्ष नेत्यांची सूचक नाराजी, नापसंती, कडक इशारे यापलीकडे काहीच झाले नाही. मात्र आत्महत्याग्रस्त ‘शेतकऱ्यांच्या मौतीला ला देखील जाऊ नये’ यासह अन्य विधाने त्यांना चंगलीच महागात पडण्याची चिन्हे आहेत. यांच्यावर पक्षांकडून कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले आहेत. गायकवाड यांच्यावर कारवाईचे आदेश दिल्याचे वृत्त आहे.

शिंदे सेनेची भूमिका

शेतकऱ्यांच्या प्रत्येक संकटात शिवसेना शिंदेसेने मदतीला धावून जाते. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिंदेसेनेने व्यापक मदत मोहीम सुरू केली आहे. शेतकरी कुटुंबांतील लाडक्या बहिणींना २५ हजार शिलाई मशिन्सचे वाटप केले जात आहे. शेतकऱ्यांच्या मुलींना २५ हजार सायकली दिल्या जात आहेत. दसरा मेळाव्यात १०० ट्रक अन्नधान्य दुष्काळग्रस्त भागात शिंदेसेनेकडून पाठवले आहेत. गुरुवारी आणखी २४ ट्रक धान्य पाठवण्यात आले अशी बाजू मांडून याप्रकरणी शिंदेसेनेकडून सावरा सावर करण्याचे प्रयत्न करण्यात आले.

शिंदेंची शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस काम करत असताना संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेनेची प्रतिमा नाहक मलीन होत असल्याची पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. शेतकरी आपला अन्नदाता असून त्याच्याविरोधातील कोणतीही विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशी तंबी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे समजते.

काय म्हणाले होते गायकवाड?

शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांनी नुकताच शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मैतीला कुणी जाऊ नये, असे विधान त्यांनी केले होते. ते म्हणाले होते की, ‘शेतकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करतो. त्याला काही अडचण असेल तर त्याने आमदार, खासदार यांना चिठ्ठी लिहावी. आम्ही सर्वजण मिळून त्याची मदत करू. पण शेतकरी कुठल्याही विचार न करता आत्महत्या करतात. त्यामुळे त्यांच्या मौतीला कुणी जाऊ नये.’ म्हणजे आपले काय हाल होतात हे ‘त्याला’ कळेल अशी विधाने त्यांनी केली होती.

सर्व पक्षातून टीका

राष्टवादी अजित दादा गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानावर संताप व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांनी आमदार गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी शिंदेकडे केली काँग्रेसनेते विजय वडेट्टीवर यांनी ही टीका केली. शिंदेसेनेतून नाराजी व्यक्त झाली. विधानपरिषद निवडणुका नंतर भाजपा व शिंदेसेनेत कलगी तुरा रंगला असतांना आमदार गायकवाड यांची विधाने मित्र आणि विरोधी पक्षासाठी आयते कोलीत ठरले.