बुलढाणा : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मी माझे स्वतःचे वैयक्तिक प्लॉट (भूखंड) विकले आहेत. त्यामुळे मी अन्नदात्याच्या विरोधात बोलेन, हा विचारही मनात येऊ शकत नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, अशा शब्दांत आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले. तसेच आपल्या विधानावरून विरोधी पक्ष, मित्र पक्षच नव्हे स्वतःच्या (शिवसेना ) पक्षात निर्माण झालेल्या राजकीय वादळावर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. संभाव्य पक्षीय कारवाईबद्दल त्यांनी बोलण्याचे टाळले.

मी व्यसनाधीन व्यक्ती संदर्भात बोललो…

शेतकरी आत्महत्यांवरून केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून कोंडी झाल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर आ. संजय गायकवाड यांनी आज शुक्रवारी काही वृत्त वाहिन्याच्या प्रतिनिधी समवेत बोलताना आपली भूमिका व बाजू मांडली. आ. गायकवाड म्हणाले, “माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ते चुकीच्या पद्धतीने पसरवले गेले.

मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल बोललोच नव्हतो, तर नशेच्या आहारी जाऊन आणि अन्य कारणामुळे स्वतःचे आयुष्य संपवणाऱ्या तरुणांच्या आत्महत्येबाबत मी उद्विग्नतेने बोललो होतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला तरीही माझ्या शब्दांमुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मन दुखावले असेल, तर मी अत्यंत विनम्रपणे दिलगिरी व्यक्त करतो,” असे आ. संजय गायकवाड म्हणाले .

कारवाईच्या प्रश्नावर…

दरम्यान, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी तुमच्या संभाव्य निलंबनाचा प्रस्ताव ठेवला आहे का आणि तुमच्यावर कठोर कारवाई होणार का?, असा सवाल पत्रकारांनी या संवाद दरम्यान विचारला. यावर काहीही बोलण्याचे टाळत आमदार संजय गायकवाड यांनी त्यावर केवळ “नो कॉमेंट्स” अश्या मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली . त्यांनी अधिक भाष्य करणे तर सोडा पण थोडक्यात उत्तर देण्याचेही टाळले.