बुलढाणा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतान यांच्यसमवेत तुलना केल्याचे पडसाद राज्यात उमटले आहे.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघांचे आक्रमक आमदार संजय गायकवाड (शिवसेना शिंदे गट) या विधानावर चांगलेच भडकले. त्यांनी आपले विरोधक हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. सपकाळ हैद्राबादच्या निजामाची वैचारिक औलाद आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्यांविषयी काहीही बोलण्याची त्यांची ही नेहमीचीच सवय आहे, असे गायकवाड म्हणाले.

बुलढाण्यात प्रसार माध्यमांनी त्यांना सपकाळ यांच्या विधानाबद्धल छेडले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्या बद्धल त्यांनी संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील कोणत्याच राजाशी तुलना होऊ शकत नाही. ते अद्वितीय राजे होते. इतर कोणाशीच त्यांची तुलना होऊ शकत नाही. त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी, रयतेच्या स्वराज्यासाठी लढा दिला. अठरा पगड जातींना सर्व धार्मियांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. मातृभूमी, आया बहिणीचे रक्षण केले. परकीय शक्तींना नामोहरम केले, असे आमदार गायकवाड म्हणाले.

काय म्हणाले होते सपकाळ

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल आज बुलढाण्यात मोठे वक्तव्य केले. त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यातील काम समकक्ष आहे, असे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी टीका केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचे आहे, त्यांनी स्वराज्य नावाचा ज्या पद्धतीने विचार नेला आहे, अगदी त्यांच्यांच मांदियाळीमध्ये, त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, अर्थात भूमीपुत्र होऊन गेले, त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष बघितलं पाहिजे”, असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते.