“मी खूप सोपं काम करत आलोय
जसं की;
रोज कामावर जाणं
इमानदारीनं काम करणं
दिवसभर भेटलेल्या व्यक्तींशी
हसून बोलणं
बायको मुलांना वेळ देणं
मित्रांशी गप्पा करणं
कविता लिहिणं
माणूस म्हणून जगणं…
माफ करा यार !
मला कठीण काम
जमलचं नाही…”

संजय गोडघाटेची ही कविता वाचताना मला नागपुरातील एक जुनी घटना आठवली. १९८०-९० चा तो काळ चळवळींचा होता. विद्रोहाचे पलिते पेटलेले होते. तेंव्हा हातोहाती मोबाईल नव्हते. पण एखाद्या उद्वेगजनक घटनेची ठिणगी वाऱ्याच्या झोतासारखी वस्त्यावस्त्यात पसरे. संतापाचा उद्रेक होई. एकदा सीताबर्डीवरच्या धनवटे रंगमंदिरात नाटककार विजय तेंडुलकर बोलत होते.

प्रेक्षकातून त्यांच्यावर एक चप्पल भिरकावली गेली. संजय जीवने या पुढे दलित रंगभूमी गाजविणाऱ्या नागपुरातील कलावंताने ती फेकली होती. हलकल्लोळ माजला. सभा विस्कटली. धरपकड झाली. प्रकरण गाजले. विषय तेंडुलकरांच्या ‘कन्यादान’ नाटकाचा होता. एका पात्रावरून मोठा वादंग झाला होता. त्याचे ते पडसाद होते. आता तो इतिहास झाला.

आणि संजय गोडघाटे हा नागपुरातील कवी आजचे वर्तमान आहे. तो गॅस कंपनीत डिलिव्हरी मॅन आहे. वडील इमारत बांधकाम मजूर होते. दक्षिण नागपूरच्या जयभीमनगरात संजय राहतो. तो ग्रॅज्युएट आहे. दिवसाचे आठ-दहा तास ज्वलनशील गॅस सिलेंडर आपल्या खांद्यावर वाहताना संजय मनात कवितेच्या ओळी गुणगुणत असतो. कविता हे एकच व्यसन त्याला आहे.

सदा हसतमुख असलेल्या संजयच्या चेहऱ्यावर निराशा कधी दिसली नाही. कुणाविषयी मत्सर नाही. असूया नाही. कुठेही कवितेचा कार्यक्रम असो, संजय तिथे हजेरी लावणार. संधी मिळाली तर आपली कविता वाचणार. त्याचे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. तो म्हणतो तसे त्याचे रोजचे जगणे ‘सोपे’ आहे. कथा-कादंबरीत लेखक प्रतिसृष्टी निर्माण करतो. त्यात कला-कुसरीला वाव असतो. कवितेत मात्र कवीला स्वत:लाच उभे करावे लागते. तो जितका नग्न होईल, तेवढी त्याची कविता, कविता म्हणून सिद्ध होते. ‘शीर्षक नसलेले आयुष्य’ हे त्याच्या आणि त्याच्या कवितेचे एक वास्तव आहे. तो लिहितो,

“कधी हसली चूल पोटभर
कधी भूक हमसून रडली
भाकरीच्या चतकोरासाठी
आवडीची पुस्तकेही विकली
भूक देणाऱ्याला शोधतो
कापून घे पोट माझे म्हणतो…
ओझे वाहण्यात आयुष्य खंगले
तन धूळजले
रात्र हरविली
स्वप्न कोमेजले
कविता गातो, कविता ऐकतो
अन् मनाला सजवून घेतो…”

मुद्दा विषमते विरूद्ध पेटून उठण्याचा आणि निवण्याचा आहे. काळाच्या प्रवाहात जगण्याच्या प्रेरणा बदलतात, तसे साहित्याचे प्रवाहदेखील नवी वळणे घेतात. विद्रोहाचा लाव्हा थंड होतो. पण त्या खडकाळ जमिनीवर आल्हादक हिरवळ उगवते. संजय गोडघाटेची कविता मला या हिरवळीसारखी दिसते. पण तिच्या पोटात विद्रोहाचे जीवाश्म कायम आहेतच. ‘आयुष्य एक युद्ध’ या संग्रहातील एक कवितेत संजय लिहितो,

“मालक
आम्हाला या गोष्टीची तकलीफ नाही
की सिलेंडरचे ओझे
तिसऱ्या चौथ्या मजल्यावर
पोचवावे लागते
आम्हाला या गोष्टीची तकलीफ नाही
की आमच्या मांसासह आमची
हाडही रसरसतात
आम्हाला या गोष्टीची तकलीफ नाही
की आम्हाला गरजा मारून जगावं लगतं
आम्हाला या गोष्टीचा बिलकुलच
त्रास वाटत नाही की
आम्हाला पदोन्नती किंवा
वेतन आयोग नाही
आम्हाला या गोष्टीची
खंत आहे:
तुम्ही आम्हाला
माणूसच समजत नाही !”

आत्मचरित्रात लेखक बरेचदा सत्य लपविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. कवितेत कवीचा खोटा अनुभव पकडला जातो. संजयचे त्याच्या आयुष्यासारखे परिसराशीही सेंद्रीय नाते आहे. म्हणून कवितेत त्याची वस्ती, घर, माणसांसकट सगळ्या कथा-दंतकथाही जिवंत होतात. ‘घेऊन जाss गे…’ ही कविता अशीच आहे. नागपूरकर भोसले राजवंशातील बांकाबाईच्या फितुरीमुळे इंग्रजांनी राजाला पकडले होते. या घटनेचा निषेध म्हणून पोळ्याच्या पाडव्याला जागनाथ बुधवारी आणि इतवारीमधून पिवळी व काळी मारबत आणि बडग्याची धिंड निघते.

लाखो लोक आजही या उत्सवात सहभागी होतात. नागपूर हे कट्टर धर्मांध मानसिकतेचे शहर कधीच नव्हते. मारबतीचा उत्सव कोण्या एका धर्माचा-जातीचा नव्हता. (‘अफवा खरी ठरावी म्हणून’ नागपुरात धार्मिक दंगली घडवतात, ही गोष्ट अलीकडची) पूर्वी डहाका-पोवाडे असत. दांडपट्टे-आखाडा आणि मर्दानी कसरती असत. आजही गोंडी बाजा आणि आधुनिक बँड वाजवला जातो. संजयच्या कवितेत ही बांकाबाई येते. तो म्हणतो,

“बांकाबाई!
प्रशासन ठरले लुळे
स्वच्छता-आरोग्य-मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यास
अशा वेळी आशेने आम्ही बघावे तरी कुणाकडे? तुझ्याकडेच ना?
तू भोसले कुळाशी केली गद्दारी
आणि इंग्रजांनी फडकवला
शहरावर युनियन जॅक
म्हणून तू ठरलीस बदनाम मिरवणुकीचा विषय
सजा तर मिळायलाच पाहिजे ना गद्दारीची बांकाबाई!
पण या वेळेला संधी नामी आहे
तू आमच्या साऱ्याच
अस्मानी-सुलतानी संकटांना जाळून टाक
स्वतः जळत असताना
प्रायश्चित्त समजून!”

सत्तर-ऐंशीच्या दशकातील दलित कविता आठवा. वामन निंबाळकरांपासून ते यशवंत मनोहर यांच्यापर्यंत. विद्रोहाचे धगधगीत निखारे शब्दाशब्दात पेरलेले. ती कविता छापील पुस्तकात बंदिस्त नव्हती. कविता वाचून रस्त्यावरच्या मोर्चातील लोकांच्या मुठी आवळल्या जात. पण चळवळीचाही एक काळ असतो, एक इप्सित असते. प्रश्न बदलतात, तसे चळवळीचे स्वरूप बदलते.

मोर्चे गल्ली बदलतात. कार्यकर्त्यांच्या निष्ठाही यू टर्न घेतात. या पार्श्वभूमीवर विद्रोहाचे पुढे काय होते? पोटाची भूक, घरावरचे छप्पर आणि अंगावरच्या वस्त्राचे प्रश्न सनातन आहेत; बाकी सगळी तत्त्वज्ञानं ‘विकासा’च्या लाटेत विलीन होऊन जातात, मध्यरात्री शत्रूच्या गोटात पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यासारखे. म्हणून एका कवितेत संजय लिहितो,

“आम्ही दगडावर दगड रचून
करतोय मजबूत
तुमच्या इमारतीचा पाया
इकडे हवेच्या हलक्या झोक्यानं
उडत जातात आमच्या झोपड्या
तुम्ही करता दुर्लक्ष
देत नाही काळजीनं लक्ष
पण आता येत नाही राग
आम्हा असल्या हलक्या गोष्टींचा
हल्ली मी पोराच्या पाठ्यपुस्तकातील
प्रतिज्ञा वाचतोय:
‘भारत माझा देश आहे
सारे भारतीय माझे बांधव आहेत’
भावाचा कसला राग करायचा?”

पुढारी उठताबसता ‘संविधान’ शब्दाचा जप करतात. त्याच वेळी देशात बलात्काऱ्यांचे सत्कारही सुरू असतात आणि कार्यकर्त्यांच्या घरावर बुलडोझरही चालवले जातात. अशा या काळात कुणाचा कसला राग करायचा? असेच जणू हा कवी विचारतो.

प्रमोद मुनघाटे | pramodmunghate304@gmail,com