बुलढाणा : शेगाव येथील मुरारका परिवाराच्या मालकीची मुरारका जीन रिकामी करून जागेसह घराचा ताबा घेण्यासाठी अकोला येथील पन्नास जणांचा जमाव शेगावात दाखल झाला. या टोळीने गोंधळ घालून सामानाची नासधूस केली. या धक्क्याने शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक संजय मुरारका यांचा रविवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद आज शहरात उमटले. सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आजही सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, व्यापारी संघटना व नागरिकांमध्ये रोष कायम असल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी सर्वच राजकीय पक्षांसह व्यापारी व नागरिकांनी सकाळी पोलीस ठाण्यावर धडक मुक मोर्चा काढला. मुरारका यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी सविता मुरारका यांच्या तक्रारीवरून शैलेश सुधाकर खरोटे, सचिन सुहास कोकाटे,( रा. अकोला,) दिपक रामचंद्र मसने (रा. वाडेगांव ता. बाळापुर )आणि सचिन विजय पोसपुरवार (रा. अकोला) यांच्यासह ४० ते ५० जणांविरोधात गुन्हे दाखल केले.

हेही वाचा : धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याला ‘ते’च जबाबदार ; आमदार संजय गायकवाड

यापूर्वी शनिवारी दुपारी येथील महाराजा अग्रसेन चौकातील मुरारका जीनची जागा रिकामी करून त्याचा ताबा घेण्यासाठी अकोल्यावरून ४० ते ५० लोकांचा जमाव आला. त्यावेळी मुरारका यांच्या निवासस्थानी एकमेव महिला होती. त्यामुळे मुरारका कुटुंबीयांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले . माहिती मिळताच मुरारका यांच्या मित्रमंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. सविता संजय मुरारका यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मुरारका यांच्या घराजवळ पोलिसांची ‘व्हॅन’ उभी करून बंदोबस्त लावला. मात्र या घडामोडीमुळे संजय मुरारका यांना हृदय घाताचा झटका आला. त्यांना प्रथम शेगावात व नंतर अकोल्यात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay murarka death case akola mob riots in shegaon strict lockdown in city buldhana tmb 01
First published on: 10-10-2022 at 15:22 IST