नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राजकीय व्यासपीठावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ राबवून उद्धव ठाकरेंचे खासदार आपल्या गोटात खेचून केंद्रातील मंत्रिपद पदरात पाडून घेण्याबाबत शिंदे गटाच्या हालचालींना वेग आला होता. परंतु काही कारणाने ते थांबले. परंतु सोमवारी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी ऑपरेशन टायगरची कबुलीच नव्हे तर संकेतही दिले. उद्धव ठाकरे यांची राजकीय शून्यता व निष्क्रियतेमुळे त्यांचे काही खासदार व आमदार आमच्या संपर्कात आहे, असे संजय निरुपम म्हणाले.
नागपुरात प्रेस क्लबमध्ये आयोजित ‘मीट द प्रेस’मध्ये ते बोलत होते. एकनाथ शिंदे प्रत्येक निवडणुकीत राज्यभर फिरत असताना उद्धव ठाकरे कुठेच गेले नाही. उद्धव ठाकरे यांच्या निष्क्रियतेमुळे अनेक नेते पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहे. मुंबईतील दोन, तीन खासदार वगळता इतर सर्व खासदार आणि बहुतांशी आमदार आमच्या संपर्कात आहे, योग्य वेळी ते निर्णय घेतील, असे त्यांनी नमुद केले. उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये भाजपसोबतची युती तोडून मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्वाशी दगा केला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उठाव केले. पक्ष तुटतात, मात्र ज्याचा पक्ष तुटतो, तो पक्ष सांभाळण्यासाठी प्रयत्न करतो, उद्धव ठाकरे यांनी तसे प्रयत्न केले नसल्याने एकेक जण त्यांना सोडून जात असल्याचे ते म्हणाले.
बारामतीत उमेदवारावरून काँग्रेसला वेड लागल्याचा आरोप
एखाद्या वरिष्ठ नेत्याच्या निधनानंतर त्या नेत्याला श्रद्धांजली म्हणून त्या ठिकाणची निवडणूक बिनविरोध करावी, ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिनविरोध निवडणुकीची विनंती कॉंग्रेसल केली. परंतु ऐकले नाही. कॉंग्रेसला वेड लागले असून त्यांचा हा निर्णय अपरिपक्वतेचा असल्याची टिका निरुपम यांनी केली. या निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव होईल. आताही वेळ गेली नाही, कॉंग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना विलिनीकरणाचा कोणतही प्रस्ताव नाही
अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार स्वतःचा पक्ष चालवण्याऐवजी विलिनीकरणासाठी मोहिम चालवतात, ही बाब दुर्देवी आहे. याच प्रकारे शिवसेनेबाबत चर्चा केली जाते. परंतु दोन्ही शिवसेनेच्या विलिनीकरणाचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही. उद्धव ठाकरे पक्ष वाढवत नाही, म्हणून त्यांचे लोक निराश होऊन आमच्यासोबत येऊ इच्छित असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या घातापातावर विश्वास नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यूबाबत घातापाताची शंका व्यक्त केली जाते. परंतु माझा वैयक्तिकरित्या यावर विश्वास नाही. विमानाचा ब्लॅक बॉक्स कधीच नष्ट होत नाही. याप्रकरणाची सीबीआय चौकशी होत असून षडयंत्र असे तर ते पुढे येईल, असे निरुपम म्हणाले.
अंजली दमानिया यांनी स्वत:चा वापर होत तर नाही याकडे लक्ष द्यावे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक कॉल भोंदू अशोक खरात यांना केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया केला होता. यावर बोलताना निरुपम यांनी अंजली दमानिया यांनी स्वत:चा वापर तर होत नाही, याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. दमानिया यांनी सावध राहिले पाहिजे. अशोक खरातसारखे बाबा राजकारण्यांसोबत संपर्क वाढवतात. परंतु ते बंद खोलीत काय करतात, ही आम्हाला माहीत नसते. भंडाफोड झाल्यानंतर सर्व समोर येते. एकनाथ शिंदे अशोक खरातकडे गेले असतील. परंतु त्याने केलेल्या दुष्कृत्याचे समर्थन करत नाही. त्याचे कारनामे माहिती असते तर सर्वप्रथम शिंदे यांनी त्याला तुरुंगात घातले असते, असे निरुपम म्हणाले.
विदर्भात शिवसेना नव्याने उभी करणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९८ मध्ये रामटेक व नागपूरची जबाबदारी माझ्यावर दिली होती. शिवसेनेत विदर्भात अनेक कार्यकर्ते उभे झाले होते. रामटेकवरून खासदार, आमदार निवडून आणले. त्यानंतर मी मुंबईवर लक्ष केंद्रीत केले. परंतु आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरची जबाबदारी दिली. जुन्या नव्या कार्यकर्त्यांना घेऊन विदर्भात शिवसेना बळकट करणार असल्याचे त्यांनी नमुद केले.
