यवतमाळ : जल, जंगल आणि जमिनीशी एकरूप झालेली संस्कृती, निसर्गालाच दैवत मानणारा निगर्वी भाव आणि खडतर जगण्यातही जपलेली स्वाभिमानाची परंपरा अशा आदिम संस्कृतीचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे जागतिक आदिवासी दिन. या औचित्यावर केवळ औपचारिकता न पाळता, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज रविवारी बाभुळगाव तालुक्यातील पिंपरी ईजारा येथील इंदिरानगर कोलाम पोडावर जाऊन संपूर्ण दिवस आदिवासी बांधवांसोबत व्यतीत केला. शासकीय प्रोटोकॉल बाजूला ठेवून, जमिनीवर बसून केलेला हा संवाद वंचित घटकाला आत्मसन्मानाची शिकवण आणि सामाजिक न्यायाची जाणीव करून देणारा संवेदनशील उपक्रम ठरल्याची चर्चा रंगली आहे.
महिलांना वंदन आणि आदिवासी नृत्यावर धरला फेर
गावात पोहोचताच मोरपिसांचा पारंपरिक टोप परिधान करून पालकमंत्र्यांनी आदिवासी बांधवांसोबत आदिवासी नृत्यावर फेर धरला, तेव्हा सत्ता आणि जनतेमधील अंतर पार मिटून गेले. पोडावर पोहोचल्यानंतर काही ज्येष्ठ महिलांनी पाय धुवून पालकमंत्री राठोड यांचे स्वागत केले. तेव्हा त्यांनीही या महिलांचे पाय धुवून त्यांना वंदन केले. या प्रसंगाने उपस्थित महिला भाऊक झाल्या आणि त्यांच्या गालावर अश्रू ओघळले. कार्यक्रम स्थळी जात असताना गावातील कौशल महादेव अंजिकर या वृद्ध महिलेने आदिवासी पारंपरिक नृत्याचा फेर धरला. तेव्हा पालकमंत्रीही आदिवासी नृत्यावर थिरकले.
अधिकाऱ्यांना तत्काळ अंमलबजावणीचे निर्देश
पालकमंत्र्यांनी चावडीवर गावकऱ्यांसोबत खाली बसून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. कोलाम समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावातील प्रलंबित प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता, उपस्थित अधिकाऱ्यांना तत्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले. आदिवासी पोडावरील समस्यांच्या फॉलोअपसाठी विशेष स्वीय सहायकाची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आपली बोलीभाषा, जल-जंगलावर आधारित जीवनशैली आणि निसर्गपूजक परंपरा ही आदिवासी संस्कृतीची खरी मुळे आहेत. तरुणांनी आपल्या कोलामी भाषेचा अभिमान बाळगत आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी मराठी व इंग्रजी भाषेचे प्रभुत्वही मिळवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार, महिला भजनी मंडळास भजन साहित्याचे वाटप आणि स्थानिक तरुण खेळाडूंना क्रिकेट किट वाटप करण्यात आले.
काळा चहा, झुणका-भाकरी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश
आदिवासी संस्कृतीत पाहुण्यांचे स्वागत काळ्या चहा पाजून करण्याची परंपरा आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी चावडीवर सर्वांसोबत या काळ्या चहाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमानंतर आयोजित स्नेहभोजनात गावकरी आणि अधिकाऱ्यांसोबत जमिनीवर बसून झुनका-भाकरीचे भोजन घेऊन सामाजिक ऐक्याचाही संदेश दिला. यावेळी तहसीलदार मीरा पागोरे यांच्यासह शिवसेना पश्मिच विदर्भ सहसंपर्क प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख राजुदास जाधव, गजानन डोमाळे, यशवंत पवार, समन्वयक संजय हातगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख प्रद्युम्न जवळकर, आकाश राठोड, संजय रंगे, सचिन महल्ले, लोकेश इंगोले, संदीप गाडे, सुरेश चिंचोळकर, दर्शना इंगोले आदी उपस्थित होते
