scorecardresearch

“महाराष्ट्राचे देव संपले का?” शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी…”

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

“महाराष्ट्राचे देव संपले का?” शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी…”
संग्रहित

मुख्यमंत्री आज नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. महाराष्ट्राचे देव संपले का? आज महाराष्ट्राची सर्वात मोठी देवता राष्ट्रमाता जिजाऊ याच बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि ४० रेडे गुवाहाटीला नवस फेडण्यासाठी गेले, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

हेही वाचा – “ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर…”, जिजाऊंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

काय म्हणाले संजय राऊत?

“आज समोर पेटलेल्या मशाली आहेत. या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाहीत. आज ही भूमी जिजाऊंची भूमी आहे. ज्या मातेने आम्हाला शिवाजी राजा दिला. त्या भूमीत आज गद्दारांची बीज रोवली गेली आहेत. ती बीज कायमची नष्ट करण्यासाठी या मशीली पेटल्या आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“सर्वांत जास्त खोके बुलढाण्यात आले आहे. एक फुल, दोन हाफ. एक खासदार दोन आमदार. आज ते नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. महाराष्ट्राचे देव संपले का? आज सर्वात मोठी देवता राष्ट्रमाता जिजाऊ याच बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि रेडे गुवाहाटीला गेले”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – भर पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक, गुणरत्न सदावर्तेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “पवार-ठाकरेंच्या पिलावळींना…”

“हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे. बाजुला शेगाव आहे. आमच्याकडे ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणवून घेतले होते आणि मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी द्यायला गुवाहाटीला गेले. हे या राज्याचे दुर्देव आहे. एकही खोकेवाला पुन्हा निवडून येता कामा नये, अशी शपथ आपण घेतली पाहिजे”, असेही ते म्हणाले.

“मगाशी अरविंद सावंत यांनी तुरुंगाचा उल्लेख केला, शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी १०० दिवस काय, जन्मठेप भोगायला मी तयार आहे. ज्या शिवसेनेसाठी लाखो शिवसैनिक जिवाची बाजी लावायला तयार असतात, त्या शिवसेनेसाठी एक संजय राऊत कुर्बान झाला तरी काहीही होणार नाही. आमच्यावर कितीही अत्याचार केले, तरी लाखो शिवसैनिक असे मोडून विकत घेता येणार नाही”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – “शरद पवार हे ‘रिंग मास्टर’ आहेत, ते जसं…” राऊतांवर टीकास्र सोडताना शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

“आज संविधान दिवस आहे. आजच्या दिवशी आपले भारतीय संविधान अस्तित्वात आले होते. मात्र, आज राज्य बेकायदेशीपणे चालवले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संविधान दिवस साजरा करण्याचा अधिकार या सरकारला नाही. एक बेकायदेशीर सरकार आपल्या डोक्यावर बसवले आहे. हे सरकार लवकरच पडणार आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

“मी जवळजवळ ११० दिवस तुरुंगात होतो. जाताना माझ्या हातात भगवा दुपट्टा होता. हा भगवा शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याबरोबर असेल. येत्या निवडणुकीत शिवसेनेचे २५ खासदार आणि किमान ११५ आमदार आपण निवडून द्यायला हवे, शिवसेनेचा स्वबळावर मुख्यमंत्री निर्माण करून या रेड्यांचा राजकीय बळी आपण घेतला पाहिजे, तेव्हाच आपण स्वत:ला शिवसैनिक म्हणू शकू”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 17:45 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या