अकोला : गद्दारांच्या पक्षाला ॲड. प्रकाश आंबेडकर खरी शिवसेना म्हणत असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार रामदास आठवले आहेत, असे मानले पाहिजे, असा टोला शिवसेना उबाठाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज येथे लगावला. लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांना बहुमतापासून रोखणे यातच इंडिया आघाडीचे यश असून कुबड्यांच्या आधारे उभे सरकार लवकरच कोसळेल, असा दावा देखील खासदार राऊत यांनी केला.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला येथे पक्षाचा आढावा घेण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला संपूर्ण देशात, तर महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळाले. हेही वाचा.नितेश राणे यांचा घरचा आहेर, म्हणाले “काही अधिकाऱ्यांमुळे पोलीस विभाग बदनाम” २०१४ व २०१९ मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. या निवडणुकीत जनतेने नरेंद्र मोदी यांना बहुमतापासून दूर ठेवले. त्यामुळेच त्यांना केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागल्या. लवकरच त्या कुबड्या निघतील आणि केंद्र सरकार कोसळेल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर निश्चितच राज्यात सत्ता परिवर्तन होईल. सध्या राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षातील नेते, आमदारांना त्रास देण्यासह पोलिसांचा ससेमिरा मागे लावण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोप खासदार राऊत यांनी केला. सत्ता परिवर्तनानंतर आम्ही देखील सखोल चौकशी करू, त्यात मोठे घबाड समोर येईल, असे ते म्हणाले. राज्याचे सर्वाधिक नुकसान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी केले. एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री उभ्या देशाने कधी पाहिला नाही. दिल्लीचा पोपट म्हणून ते काम करीत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. लोकसभा निवडणुकीमध्ये अकोल्याची जागा अतिशय थोड्या मताने पडली. या ठिकाणी तिरंगी लढत झाल्याचा फायदा भाजपला झाला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये अकोल्यासह सात जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तो त्यांनी नाकारून भाजपाला पोषक ठरेल अशी भूमिका घेतल्याचा आरोप केला. हेही वाचा.चंद्रपुरातील वाढती गुन्हेगारी, मुनगंटीवार म्हणाले ” गुंडासाठी फोन..” एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना असल्याचे शिवसैनिक मानत असल्याचे वक्तव्य ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्याला देखील खासदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो. प्रकाश आंबेडकर यांनी असे वक्तव्य करू नये. तर मग रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, रा.सू. गवई यांनाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार मानावे, असे देखील ते म्हणाले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांनी उमेदवार उभे करावे. महाराष्ट्रातील दोन नेते भाजपचे हस्तक म्हणून काम करीत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, माजी जि. प. सदस्य डॉ. सुभाष राठोड, महानगर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर आदी उपस्थित होते.