नागपूर : केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषण करीत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे उपोषण सरकारने मोडीत काढल्यानंतर समर्थकांत संतापाची लाट उसळली आहे. नागपुरात रामरक्षा पठणासाठी असलेले शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनीही ही कारवाई दडपशाही असल्याचा आरोप करीत सरकारवर हल्ला चढवला.
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
राऊत नागपुरात प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. संताप व्यक्त करत ते म्हणाले, एकीकडे नागपुरात रामरक्षा पठणाचे मोठे आंदोलन होत असताना, नेमके शुक्रवारी रात्री वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून इस्पितळात दाखल करण्यात आले. ही निव्वळ दडपशाही असून पोलीस हे सध्याच्या सरकारचे गुलाम बनले आहेत. सरकारकडून आदेश येताच पोलिसांनी ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी केला.
रामरक्षा’ पठण आंदोलनावरून लक्ष विचलित करण्यासाठी वांगचूक यांच्यावर कारवाई
नागपुरात होणाऱ्या ‘रामरक्षा’ पठण आंदोलनाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या आंदोलनावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी लपवण्यासाठीच, मागील २० दिवसांपासून दिल्लीत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचुक यांना शुक्रवारी रात्री पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केले, असा खळबळजनक आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष
दरम्यान आज शनिवारी शिवसेनेतर्फे (उद्धव ठाकरे गट) रामनगरातील राम मंदिरात रामरक्षा पठण व महाआरती केल्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. यावेळी युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार अंबादास दानवे, अनिल देसाई, सुरज चव्हाण, नागपूर महानगरप्रमुख किशोर कुमेरिया, सतीश हरडे आदी उपस्थित राहणार आहेत. अयोध्या राम मंदिरातील दानपेटीतील चोरीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंनी सुरू केलेल्या रामरक्षा पठणावर विरोधकांनी सुरुवातीपासून जोरदार टीका केली होती. शहरातील रामनगरातील राम मंदिरातही रामरक्षा पठणावरून विशेषत: शहरातील भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आक्रमक, भाजप सावध!
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप सावध झाली असून उद्धव ठाकरे व त्यांच्या रामरक्षा कार्यक्रमावर झोंबणारी टीका करीत आहे. मुंबईत दादरच्या हनुमान मंदिरात उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा पठण केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावत उद्धव ठाकरे यांना रामरक्षा नीट वाचताही येत नाही, अशी टीका केली आणि त्यांना राजकारणासाठी रामाचा वापर न करण्याचा सल्ला दिला होता. याच धर्तीवर दोन दिवसांपासून नागपुरातील भाजपचे आमदार, माजी आमदार, शहर भाजपच्या अध्यक्षापर्यंत सर्वांमध्येच उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा पठणावरून टीकेची स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र होते.
