राज्याच्या राजकारणामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपावर टीका करताना केलेल्या एका वक्तव्यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळे काय म्हणालेल्या?
राज ठाकरेंनी सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तुलना करताना एकाच्या घरावर छापेमारी होते आणि दुसऱ्याचा नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणावर टीका केली होती. याच टीकेला आता सुप्रिया सुळेंनी सोलापूर दौऱ्यावर असताना नुकतच एका पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिलं. अजित पवार यांच्यावर छापेमारी होते, पण, सुप्रिया सुळे यांच्यावर अशी कारवाई होत नाही, असं राज ठाकरे म्हणाल्याचा संदर्भ देत सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, अजित पवारांच्या घरावर छापा पडल्याची माहिती चुकीची असल्याचं त्यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> “येईल, भाषण देईल आणि…”, औरंगाबादेत NCP कार्यकर्त्यांसमोर सुप्रिया सुळेंनी उडवली राज यांची खिल्ली; सभागृहात पिकला हशा

राज ठाकरेंचं नाव न घेता दिलं उत्तर…
“मला कुणाची चूक नाही काढायची. माझा तो स्वभाव नाही. पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच राज ठाकरेंचा थेट उल्लेख टाळत सुप्रिया यांनी, “त्यामुळे कदाचित लोकांना चुकीची माहिती दिली असेल. माझ्या भावाच्या घरी आजपर्यंत कधीच रेड झालेली नाही. (टीकेचा) बेसच चुकीचा असल्याने तुलनेचा प्रश्न येतच नाही,” असंही सांगितलं.

नक्की वाचा >> “१२ वाजता उठणाऱ्याने अजित पवारांवर टीका केली म्हणून…”; राष्ट्रवादीचा राज ठाकरेंना टोला

नवऱ्याला नोटीस आल्याची दिली माहिती…
पुढे बोलताना सुप्रिया यांनी, “मी बऱ्यापैकी बोलते भाषणांमध्ये त्यांच्याविरोधात पण मला अजून तरी ईडीची नोटीस आली नाही. माझ्या नवऱ्याला आयकर विभागाकडून टॅक्सची नोटीस आलीय. तीन भाषणं विरोधात केल्यानंतर त्यादिवशी तिसरं भाषण तेव्हा संध्याकाळ चार वाजता आयटीची नोटीस आली,” असंही हसत हसत सांगितलं.

राऊत यावर काय म्हणाले
सुप्रिया सुळेंनी नवऱ्याला नोटीस आल्याचा उल्लेख केल्याचं सांगत सध्या नागपूर दौऱ्यावर असणाऱ्या संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी प्रश्न ऐकून झाल्यावर, “आमच्या घरावर ही ईडीच्या धाडी पडल्या, आम्ही सरकारच्याविरोधात बोलल्यावर. अशाप्रकारे राज्य चालत नाही, समोरून लढायला पाहिजे,” असं उत्तर दिलं.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut on it notice to supriya sule husband scsg
First published on: 22-04-2022 at 20:35 IST