नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात महिलेवर बलात्कार करून तिच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या करणाऱ्या संजू विश्वनाथ सरकार याची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रद्द केली. मात्र, आरोपीला सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. ही घटना गंभीर असली, तरी ती ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ या श्रेणीत मोडत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
काय होते प्रकरण?
पीडित महिलेचा पती रोजगारासाठी आंध्र प्रदेशात गेला होता. त्यामुळे महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलासह घरी होती. १२ जून २०१७ रोजी मध्यरात्रीनंतर सुमारे दोन वाजता संजू तिच्या घरात शिरला. त्याने महिलेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. महिलेने प्रतिकार केला असता आरोपीने तिच्या मुलाला निःशब्द करण्यासाठी त्याची हत्या केली. त्यानंतर महिलेचा गळा चाकूने चिरून तो घटनास्थळावरून पळून गेला. दुसऱ्या दिवशी वेळेवर उपचार मिळाल्याने महिलेचे प्राण वाचले.
सत्र न्यायालयाने सुनावली होती फाशी
२४ सप्टेंबर २०२५ रोजी अहेरि सत्र न्यायालयाने संजूला हत्येच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावली होती. बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न या गुन्ह्यांसाठी प्रत्येकी जन्मठेप व दोन हजार रुपये दंड, तर घरात बेकायदेशीर प्रवेश केल्याबद्दल दहा वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षाही ठोठावली होती. फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयाची मंजुरी आवश्यक असल्याने हे प्रकरण खंडपीठासमोर आले. आरोपीनेही शिक्षेला आव्हान दिले होते.
शिक्षेच्या प्रमाणावर न्यायालयाचे निरीक्षण
प्रकरणाची सविस्तर सुनावणी केल्यानंतर उच्च न्यायालयाने ही घटना ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ या निकषात बसत नसल्याचे स्पष्ट केले आणि फाशीची शिक्षा रद्द केली. मात्र, गंभीर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन जन्मठेपेच्या शिक्षेसह अन्य शिक्षा कायम ठेवल्या. संजूच्या वतीने अॅड. राजेंद्र डागा, तर राज्य सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अॅड. संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.
‘निर्णयाला आव्हान देणार’
“सामाजिक संवेदनांना हादरा देणारी ही अतिशय गंभीर घटना आहे. या गुन्ह्यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा मिळायला हवी. त्यामुळे या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शिफारस राज्य सरकारला करणार आहोत,” अशी प्रतिक्रिया अतिरिक्त सरकारी वकील अॅड. संजय डोईफोडे यांनी दिली.
